अजून येतो वास फुलांना...

डॉ. श्वेता चिटणीस


“अजून येतो वास फुलांना,
अजून माती लाल चमकते,
खुरट्या बुंध्यावरी चढून,
अजून बकरी पाला खाते...”


बा.सी. मर्ढेकर यांची ही कविता सांगते त्याप्रमाणे अजूनही जाई, जुई, मोगरा, चाफा... या फुलांना सुवास येतो आहे... या कवितेतून बोध घेऊन आपण वेळीच सावरायला हवे, आपले पसारे आवरायला हवेत... अन्यथा हवा आणि पाणी या दोन जीवनावश्यक स्त्रोतांचा वापर आपण कचरापेटीसारखा केल्यास जलप्रदूषण आणि वायू प्रदूषण वाढल्यास फुलांचे सुवास येणे कमी कमी होत जाते... शहरांपासून दूर, लहान शहर किंवा खेडेगावात गेल्यास तिथल्या फुलांना जो घमघमाट येतो, सुंदर सुवास येतो, त्यापेक्षा कैकपटीने कमीच, त्याच फुलांना शहरात सुवास येतो... हे सुहास आपल्या नाकापर्यंत आणि तिथून मेंदूपर्यंत पोहोचण्यामध्ये प्रदूषित हवा, ध्वनिप्रदूषण, व्यस्तता असे सारेच अडथळे येतात.


बा. सी. मर्ढेकर याच कविता म्हणतात...


“भूकंपाचा इकडे धक्का,
पलीकडे अन् युद्ध - नगारे;
चहुकडे अन् एकाच गील्ला
जुन्या शवांवर नवीन निखारे...”


१९५० साली लिहिलेली ही कविता प्रकृतीच्या अवहेलनेमुळे उडवलेल्या नैसर्गिक आपत्तीवर भाष्य करते. तसेच युद्धजन्य परिस्थितीवर सुद्धा भाष्य करते. आजही जगाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात वणवे, भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्ती ओढवतात तरीही मानव त्यातून शिकत नाही, अनेक देशांमध्ये युद्ध तरी सुरू आहे किंवा युद्धजन्य परिस्थितीचे सावट आहे.


नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा युद्धामुळे जीवितहानी होतेच आहे तरीही आपण बेसुमार जंगलांची कत्तल, हवेचे प्रदूषण, पाण्याचे प्रदूषण यात वाढ करत आहोत. तरीही फुलांनी सुहास पसरवणे सोडले नाही किंवा निसर्गाने झाडं वाढवणे सोडले नाही. त्यामुळे आपला असा समज झालेला आहे की, आपण काहीही केले तरीही निसर्ग सारं काही निभावून नेईल. समुद्र सगळा कचरा पोटात घेईल, जंगल वाढत राहतील, फुले फुलत राहतील, अन्नपुरवठा होत राहील. कारण आजही बऱ्याच लोकांना हवामान बदलल्यामुळे नैसर्गिक आपत्ती ओढवतात. त्याचा आणि आपला काहीच संबंध नाही असे वाटते व त्यामुळे हवातेवढा कचरा करा, प्लास्टिक समुद्रात टाका, घातांक रसायनांचा निचरा शुद्धीकरण न करता नदी नाल्यांमध्ये करा, काही फरक पडत नाही. इतक्या सगळ्या लोकसंख्येत मी एकट्याने कचरा केल्याने काय फरक पडणार आहे, असे ज्यांना वाटते त्यांनी काही विचार करावा की असे प्रत्येकालाच वाटू लागले तर निसर्गाचा ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही.


“तरीही येतो वास फुलांना...” हे आजच्या पिढीपर्यंत आपणही म्हणू शकतो; परंतु येणाऱ्या पिढ्यांसाठी शुद्ध हवा, शुद्ध पिण्याचे पाणी, नद्या, झाडं, समुद्र, फुले, पक्षी आणि इतर नैसर्गिक वारसा हे सारं सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपल्या पिढीवर आहे.


जागतिक पर्यावरण दिवसाची सुरुवात आपण किमान प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या विचाराने करूया. भाजीवाल्यांकडे, मिळणाऱ्या पातळ प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्याऐवजी शक्य असेल तिकडे कापडी पिशव्यांचा वापर, बांबू किंवा ज्यूटमधून बनवलेल्या वस्तू, टिकाऊ भांडी यांचा वापर वाढवून टिकाऊ जीवनशैली अंगीकारल्यास हवामान बदलाचे दाह कमी करण्यात मदतच होईल.

Comments
Add Comment

अफजलखान वध : इतिहासातील सोनेरी पान

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला नुकतीच १७ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने सागरी सुरक्षा व्यवस्थेच्या

लिटिल मास्टर सुनील गावसकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर सुनील मनोहर गावसकर. वेंगुर्ले उभादांडा हे त्यांचे गाव. क्रिकेटच्या इतिहासात कधीही न

हम्पी म्हणजे : दगडात कोरलेली विजयनगर साम्राज्याची वैभवगाथा

विशेष : लता गुठे आपण देश-विदेशात फिरत राहतो तेव्हा अनेक शहरं आपल्याला आवडतात पण नजरेत भरणारं आणि मनात कायम

आखिरी गीत मोहब्बतका सुना लूं तो चलूं

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे नोव्हेंबर महिन्यातला सोमवार आला तो एक अतिशय वाईट बातमी घेऊनच. आठच दिवसांपूर्वी

उर्वशी-पुरुरवाची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे इंद्राच्या दरबारात अनेक सुंदर अप्सरा होत्या. त्या नेहमीच चिरतरुण असल्याचे

मालकाचे घर, दादागिरी भाडोत्रीची

क्राइम : अॅड. रिया करंजकर शहरामध्ये नोकरीची आणि उद्योगधंद्याची मुबलकता असल्यामुळे ग्रामीण भागातील युवक शहराकडे