भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर :अभिजित आणि मनीषा सोनावणे

काळोखाच्या गावी, प्रकाशाच्या वाटा : श्रद्धा बेलसरे खारकर


डॉक्टर अभिजित सोनावणे उच्च विद्याविभूषित. डॉक्टर एका बहुराष्ट्रीय कंपनीत महत्त्वाच्या हुद्द्यावर काम करत होते. महिन्याला तीन-चार लाख रुपये पगार, समाजात मानमरातब, सारे काही छान होते. लवकरच त्यांना बढती मिळणार होती आणि अचानक एके दिवशी त्यांना तरुणपणी ज्यांनी खूप मदत केली होती त्या ‘बाबांची’ आठवण आली. डॉ. सोनावणे त्या बाबांना भेटायला त्यांच्या गावी गेले. बऱ्याच चौकशीअंती कळाले की, बाबा हयात नव्हते. घरच्या लोकांनी त्यांना घराबाहेर काढले होते. त्यांची अवस्था इतकी वाईट झाली की उरलेले आयुष्य बाबा अनेक वर्षे भिक्षा मागून जगले. हा डॉक्टरला फार मोठा धक्का होता. ज्या उदार बाबांनी मला एवढी मदत केली त्यांच्यावृद्धपकाळात मी त्यांच्यासाठी काहीच करू शकलो नाही. मला पितृतुल्य असलेल्या त्या सज्जन व्यक्तीने बेवारस म्हणून अखेरचा श्वास घेतला! झाले! प्रचंड मन:स्ताप आणि दुख अनावर होऊन त्यांनी एक जगावेगळा निर्णय घेतला. आता आपण उर्वरित आयुष्य भिकारी लोकांचे आरोग्य सुधारण्याचेच काम करायचे.


डॉक्टरांनी तडकाफडकी नोकरीचा राजीनामा दिला. जवळच्या भिकारी लोक राहत त्या वस्तीत गेले, पण भिकारी त्यांना जवळ येऊ देईनात. त्यांना वाटायचे हा गोड बोलून आपल्या किडन्या विकेल किंवा आपल्या पोरींना धंदा करायला लावेल. असे ३१ महिने गेले. काही काम होत नव्हतं, मनात प्रचंड निराशा दाटून आली होती, अशावेळी त्यांना त्यांच्या पत्नी डॉ. मनीषा यांनी साथ दिली. एकदा डॉ. अभिजितना एक भिकारी रस्त्यातच पडलेला दिसला. त्याला खूप जखमा झाल्या होत्या. सडलेल्या त्वचेमुळे दुर्गंधी सुटली होती. त्यामुळे कुणी जवळपासही फिरकत नव्हते. डॉक्टरांनी त्या भिकाऱ्याला खाली बसून तिथेच तपासले. त्याच्या जखमा धुतल्या, त्याला मलमपट्टी केली. या प्रसंगामुळे मग हळूहळू इतर भिकाऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास बसू लागला. प्रत्येक देवाचा एक वार असतो तो वार हेरून त्यादिवशी डॉक्टर त्या मंदिरासमोर, मशि‍दीसमोर जाऊ लागले. सर्वांना मोफत औषधोपचार करू लागले. आजही सकाळी १० ते ३ त्यांचे उपचार सुरू असतात.


आज डॉ. अभिजित आणि डॉ. मनीषा सोनावणे यांनी जणू भिक्षेकऱ्यांचे एक कुटुंबच तयार केले आहे. तब्बल ११०० ‘पूर्व-भिक्षेकरी’ या कुटुंबाचे सदस्य आहेत. त्यांनी अशाच ५२ मुला-मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. यावर्षी तर या जगावेगळ्या कुटुंबातील एक मुलगी उत्तम शिकून, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून इन्स्पेक्टर झाली! दुसऱ्या एका मुलीला कलेक्टर व्हायची महत्त्वाकांक्षा आहे. तिलाही डॉक्टर दाम्पत्य स्पर्धा परीक्षेच्या क्लासला घालणार आहेत.


भीक मागणारे काहीजण चक्क अंशत: अंध असतात. त्यांना अगदीच कमी दिसत असल्याने अनेकदा रस्त्यात त्यांचे जीवघेणे अपघात होतात. असे भिकारी शोधून काढून डॉक्टरांनी ५५० लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करून दिले आहे. डॉक्टर अभिजित आणि डॉ. मनीषा यांनी अशा अनेकांना दृष्टी प्राप्त करून दिली आहे. त्यांनी रस्त्यावर खितपत पडलेल्या १६ आजी-आजोबांना विविध वृद्धाश्रमात निवारा मिळवून दिला आहे. अनेकदा अशा लोकांना त्यांची ओळख नसते. मग ते डॉक्टरचे ‘आजी आजोबा’ म्हणूनच तिथे राहतात.


भिकाऱ्यांनी भीक मागायचे सोडून कष्टकरी व्हावे अशी डॉक्टरांची इच्छा आहे. मात्र हे काम अतिशय अवघड आहे. इतकी वर्षे भीक मागितल्याने त्या व्यक्तीचा स्वाभिमान अगदी नष्ट झालेला असतो. शिवाय आयते खाण्याची सवय झालेली असल्याने कष्ट करणे जीवावर येते. या अवस्थेत गेल्यामुळे आत्मभान पार गेलेले असते. डॉ. सोनावणे मात्र याच ‘भिक्षेकऱ्यांना कष्टकरी’ आणि पुढे गावकरी करण्याचे स्वप्न बाळगून आहेत.


त्यांनी सांगितलेली एक कहाणी अगदी हृदयद्रावक होती. एक भिकारी होता. त्याला बोलता, चालता येत नव्हते. तो रस्त्यावर रांगत भीक मागायचा. त्याचे तळवे, गुढगे सोलवटून निघाले होते. मांडीचे तर मास उघडे झाले होते. बाहेरून सहज दिसत होते. डॉक्टरांनी हे पाहताच आधी त्याच्यावर सर्व आवश्यक उपचार केले. मग एका मित्राला बोलून त्यांच्याकडून एक व्हीलचेअर मिळवली. त्या वृद्धाला व्हीलचेअरवर बसवले, ती खुर्ची कशी वापरायची ते शिकवले. तो वृद्ध इतका भारावून गेला की कसे व्यक्त व्हावे तेच त्याला समजेना. कारण त्या बिचाऱ्याला बोलताही येत नव्हते. त्याची कृतज्ञता मग डॉक्टरांना त्याच्या स्पर्शातून समजली. डॉ. त्याला म्हणाले, ‘आजोबा आता खुर्ची मिळाली. आता भीक मागू नका. मी तुम्हाला रुमाल आणून देतो ते खुर्चीवर बसून विकत जा.’ आणि चमत्कार म्हणजे आता ते आजोबा खुर्चीवर बसून हसत रुमाल विकत असतात!


एक कहाणी तर अकल्पित आणि अत्यंत धक्कादायक होती. एक तरुण मुलगा भीक मागत नव्हता तर इतर भिकारी जी भीक मिळवत तीच तो त्यांच्यावर दादागिरी करून पळवायचा. डॉक्टरांची त्याच्याशी ओळख झाल्यावर त्यांनी चक्क त्याच्याशीसुद्धा मैत्री केली. त्याला त्यांचा लळा लागला. प्रेमाने तो प्रसंगी दादागिरीसुद्धा करत असे. मात्र तो डॉक्टरचे सगळे ऐकायचा. म्हणायचा, ‘आपके लिये कुछ भी करुंगा,
मर्डर भी करुंगा!’


त्याचेही मन परिवर्तन करून त्याला कामाला लावले.डॉक्टर दररोज सकाळी त्यांच्या मोटारसायकलवर भल्यामोठ्या पिशव्या घेऊन निघतात. या पिशव्यात त्यांचा अख्खा दवाखाना असतो! चांगली लाखो रुपयांची नोकरी सोडून ते अहोरात्र भिकाऱ्यांच्या पुनर्वसनाचे काम करतात, तर त्यांच्या पत्नी डॉ. मनीषा संस्थेच्या ऑफिसचे सर्व काम सांभाळतात. दोघांचा संसार आता ११०० लोकांचा झाला आहे. जगाने टाकलेल्या जीवांना पुन्हा ‘माणसे’ केलेल्या या कुटुंबावर लोकांचे इतके प्रेम आहे की, अनेक माजी भिकाऱ्यांनी आपल्या मुलाचे नाव ‘अभिजित’ आणि मुलीचे नाव ‘मनीषा’ ठेवले आहे!


मध्यरात्रीचे सूर्य :
‘मध्यरात्रीचे सूर्य’ हे भिक्षेकऱ्यांसाठी रोजगार आणि प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात आधीचे भिक्षेकरी... आता कष्टकरी आणि श्रमिक एकत्र येऊन विविध वस्तूंचे उत्पादन करत आहेत. जास्तीत जास्त पैसे मिळवून सर्व भौतिक सुखांचा पुरेपूर आनंद घ्यायच्या या युगात आणि कोणताही विवेक न ठेवता फक्त पैसे कमावणे हेच अनेकांचे (सर्वांचे नाही!) एकमेव ध्येय बनलेल्या या व्यवसायात डॉ. अभिजित आणि डॉ. मनीषासारखे लोक भेटणे म्हणजे देवदूतच भेटल्यासारखे वाटले. त्याच्या कामाला मनापासून सलाम!


sohamtrust2014@gmail.com

Comments
Add Comment

अफजलखान वध : इतिहासातील सोनेरी पान

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला नुकतीच १७ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने सागरी सुरक्षा व्यवस्थेच्या

लिटिल मास्टर सुनील गावसकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर सुनील मनोहर गावसकर. वेंगुर्ले उभादांडा हे त्यांचे गाव. क्रिकेटच्या इतिहासात कधीही न

हम्पी म्हणजे : दगडात कोरलेली विजयनगर साम्राज्याची वैभवगाथा

विशेष : लता गुठे आपण देश-विदेशात फिरत राहतो तेव्हा अनेक शहरं आपल्याला आवडतात पण नजरेत भरणारं आणि मनात कायम

आखिरी गीत मोहब्बतका सुना लूं तो चलूं

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे नोव्हेंबर महिन्यातला सोमवार आला तो एक अतिशय वाईट बातमी घेऊनच. आठच दिवसांपूर्वी

उर्वशी-पुरुरवाची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे इंद्राच्या दरबारात अनेक सुंदर अप्सरा होत्या. त्या नेहमीच चिरतरुण असल्याचे

मालकाचे घर, दादागिरी भाडोत्रीची

क्राइम : अॅड. रिया करंजकर शहरामध्ये नोकरीची आणि उद्योगधंद्याची मुबलकता असल्यामुळे ग्रामीण भागातील युवक शहराकडे