“बाते हैं बातों का क्या?”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे


राजकुमारच्या ‘उपकार’ची (१९६७) अनेक वैशिष्ट्ये होती. एक तर तो मनोजकुमारने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा होता. दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला खुद्द स्व. लालबहादूर शास्त्रीजींनी त्यांच्या “जय जवान जय किसान” या घोषणेचा आशय ‘लोकांपर्यंत पोहोचवायला सिनेमा काढ’ अशी सूचना केली होती. तिसरे म्हणजे या सिनेमात आपल्या महेश कोठारे यांनी लहानपणीच्या मनोजकुमारची भूमिका केली होती.


स्व. शास्त्रीजींनी सुचवलेल्या विषयावरची उपकारची कथा मनोजकुमारने लिहिली ती दिल्ली ते मुंबई या रेल्वेप्रवासात! त्याचे उत्तम ग्रामीण बोलीतले संवाद लोकप्रिय झाले होते. कथा होती दोन भावांची. भारत (मनोजकुमार) हा गावात राहून शेती करणारा शेतकरी आहे. त्याने धाकटा भाऊ पुरनला (प्रेम चोपडा) उच्च शिकवण्यासाठी शहरात पाठवले आहे. त्यासाठी त्याने खूप कष्ट घेतले आहेत; परंतु तो शिक्षण पूर्ण करून जेव्हा गावात परततो तेव्हा पूर्णपणे बदललेला, स्वार्थी माणूस झालेला आहे. त्यातून संपत्तीचे वाद सुरू होतात. त्याला त्याचा हिस्सा घेऊन विकून टाकायचा आहे. तेवढ्यात १९६५चे भारत-पाक युद्ध सुरू होते आणि भारत सैन्यात नोकरी करायला निघून जातो. इकडे काका चरणदासच्या नादी लागून अगदी स्वार्थी बनलेला पुरन युद्धकाळाचा फायदा घेऊन अन्नधान्याची साठेभाजी करतो आणि नफा कमावतो.


दरम्यान भारत युद्धात बहादुरी दाखवतो, मात्र शत्रूच्या तावडीत सापडतो आणि हुशारीने सुटूनही येतो. युद्धात त्याचे दोन्ही हात गेले आहेत. तो गावात परत येतो तेव्हा पुरनच्या लक्षात येते की, कारस्थानी चाचा दोन्ही भावात भांडणे लावण्याचा प्रयत्न करत होता. पश्चाताप होऊन शेवटी पुरन भावडीलभावाजवळ जातो आणि दोघे भाऊ एक होतात व सिनेमा सुखांत होतो.


सिनेमात मनोजकुमारबरोबर अनेक दिग्गज कलाकार होते. आशा पारेख, प्राण डेव्हिड, कामिनी कौशल, मदन पुरी, अरुणा इराणी, मोहन चोटी आणि टूनटून. सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे फिल्मफेयर पारितोषिक मिळाले. मनोजकुमारला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे, कथेचे, संवादलेखनाचे तर प्राणला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचे, गुलशन बावरा यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचे, बी. एस. ग्लाड यांना सर्वोत्तम संकलनाचे पारितोषिक मिळाले. याशिवाय सर्व द्वितीय राष्ट्रीय चित्रपटाचे आणि बॉम्बे फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनचे सर्वोत्तम संवाद लेखनाचे पारितोषिक मनोजकुमारला, सर्वोत्कृष्ट गायकाचे महेंद्रकपूरला मिळाले. कल्याणजी-आनंदजींचे आणि महेंद्रकपूरचे नामांकन सर्वोत्कृष्ट संगीतकार आणि सर्वोत्कृष्ट गायक म्हणून फिल्मफेयरसाठी झाले होते.


कमर जलालाबादी, इंदीवर, गुलशन बावरा आणि प्रेम धवन या ४ गीतकारांची सर्व गाणी लोकप्रिय झाली. त्यात सदाबहार ‘मेरे देशकी धरती’ बरोबरच प्रेम धवन यांचे “आई झुमके बसंत, झुमो एक रंगमे, आज रंग लो दिलोंको एक रंगमे” गुलशन बावरा यांचे “हर खुशी हो वहा, तू जहां भी रहे” विशेष लोकप्रिय झाले. बिनाका गीतमालातही “मेरे देशकी धरती सोना उगले उगले हिरे मोती” चांगलेच गाजले. सिनेमात प्राणला प्रथमच सकारात्मक भूमिका मिळाली होती. तीही प्रेक्षकांनी उचलून धरली. त्यांच्या तोंडी असलेले गुलशन बावरांचे गाणे एखाद्या अध्यात्मिक गुरूसारखे गंभीर संदेश देणारे होते. एका पायाने लंगडा असणारा मलंगचाचा (प्राण) ते गात गावात फिरत असतो. त्याला जणू भोळ्याभाबड्या भारतला सावध करायचे असते. भारत कुणावरही विश्वास ठेवणारा, सगळ्यांचे चांगले चिंतणारा साधासरळ ग्रामीण युवक आहे. त्याला बदलत्या जगापासून सावध करण्यासाठीच जणू प्राण म्हणतो तू सगळ्यांवर विश्वास ठेवू नकोस, प्रेम, शपथा, आणाभाका या गोष्टी तावूनसुलाखून पाहिल्यावरच विश्वास ठेवायच्या असतात. जगातली अनेक नाती केवळ स्वार्थाच्या धाग्याने बांधलेली असतात. प्रसंग आल्यावर कुणी कुणाचे नसते.-


‘कसमें वादे प्यार वफा सब
बातें हैं, बातोंका क्या?
कोई किसीका नहीं ये झूठे
नाते हैं, नातों का क्या?
कसमें वादे प्यार वफा...’


मलंगचाचा मुस्लीम आहे. त्यामुळे त्याचे भावविश्व त्याच्या श्रद्धावर आधारलेले आहे. तो म्हणतो, ‘अशीही वेळ येईल की तुझा प्रेषित, उद्धारक तुझ्यासमोर उभा असेल तरीही तू वाचणार नाहीस. तुझे जीवलगच तुझा घात करतील. आदर्शाची स्वप्ने पाहत तू आकाशात उडत असशील पण तुझी नियती तुला क्षणात मातीत आणून मिळवेल.’


‘होगा मसीहा सामने तेरे,
फिर भी न तू बच पायेगा.
तेरा अपना खूनही आखिर
तुझको आग लगायेगा.
आसमानमें उडनेवाले,
मिट्टी में मिल जायेगा.
कसमें वादे प्यार वफा...’


या जगात सगळे सुखाचे साथी आहेत. सुख आहे तोवर तुझ्याबरोबर बागडणारे, तुला प्रेमाची, मैत्रीची खात्री देणारे दु:ख येताच तुला सोडून जातील. तुझ्या मनाचा ते जराही विचार करणार नाहीत. यांचे मन इतके स्वार्थी आणि संवेदनशून्य असते की ते प्रत्यक्ष परमेश्वरालाही जुमानत नाहीत तर माणसाची काय कथा?


‘सुख में तेरे साथ चलेंगे,
दुख में सब मुख मोडेंगे.
दुनियावाले तेरे बनकर,
तेराही दिल तोड़ेंगे.
देते हैं भगवानको धोखा,
इन्सांको क्या छोड़ेंगे!
कसमें वादे...’


युद्धानंतर, दंगलीनंतर मंदिरे, मशिदी तोडल्या जातात हे तसे भारतात नेहमीचे दृश्य. पण त्यावर मलंगचाचा जे प्रश्न विचारतो ते खरंतर आजच्या भारतालाही अंतर्मुख करणारे आहेत. मलंगचाचा म्हणतो जर हे हिंदू व्यक्तीचे काम असेल तर त्याने देवाचे मंदिर कसे काय लुटले? जर हे काम मुस्लिमाचे असेल तर त्याने खुदाशी संवाद साधण्याचे त्याचे घर कसे काय तोडले? म्हणजे देव मानणाऱ्या दोघांनी एकमेकांच्या देवाची घरं तोडली, लुटली. हे ज्यांना चालते, हे ज्यांना योग्य वाटते त्या कुणाचाही धर्म खरा धर्म कसा असेल? ती तर धर्माची खोटी कल्पना!


‘काम अगर ये हिन्दूका है,
मंदिर किसने लूटा है?
मुस्लिमका है काम अगर ये,
खुदाका घर क्यूँ टूटा है?
जिस मजहबमें जायज है ये,
वो मजहब तो झूठा है
कसमें वादे प्यार वफा...’


इंदीवर यांनी मलंगचाचाच्या तोंडी टाकलेल्या या भेदक प्रश्नामुळेच कदाचित गाण्याचे हे कडवे कधीच आकाशवाणीवर वाजवले गेले नसावे. सिनेमाच्या कथेबाहेर जाऊन असे एकंदर जीवनाबद्दल गंभीर भाष्य करणारी, कुणाच्याही व्यक्तिगत दु:खात त्याला दिलासा देणारी चिंतनशील गाणी दिसतात का अलीकडे एखाद्या सिनेमात? असतील तर सांगा!

Comments
Add Comment

ब्रह्मचर्य

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे शुकदेव हे भारतीय आध्यात्मिक परंपरेतील व पुराणातील एक तेजस्वी वैराग्यशील

तोलावा शब्द । बोलण्यापूर्वी ...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या बाबतीत घडलेला हा एक

खेड्यामधले घर कौलारू...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे जुन्या आठवणी निघाल्या की, आठवते ते चाळीतले आमच्या शेजारी राहणाऱ्या बापू

मुरलीरव म्हणजे सुमधुर स्वरसुगंध

स्मृतिगंध : लता गुठे आज सकाळी सकाळी एक बासरीवाला इमारतीच्या खालून बासरी वाजवत चालला होता. खूप सुंदर सूर त्यामधून

स्वराज्यजननी माँसाहेब

संस्कृतीचा गोडवा : पूर्णिमा शिंदे स्वराज्य प्रेरिका, स्वराज्य जननी, थोर राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँ

श्रद्धा

जीवनगंध : पूनम राणे आज मंगळवार आणि संकष्टीचा दिवस होता. हनुमान चौकातील गणेश मंदिर विविध रंगांच्या फुलांनी सजवले