Monday, August 4, 2025

विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय मुलग्याचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय मुलग्याचा मृत्यू

बदलापूर : बदलापूर गावातील चिंतामणी चौकात अमृत टॉवरमध्ये राहत असलेल्या राजवीर अमृत लोखंडे या १४ वर्षांच्या बालकाचा गार्डनमध्ये खेळत असताना दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. पूर्वी कोपरी गाव, वाशी येथे राहणारे लोखंडे कुटुंबीय हे मागील १५ दिवसांपूर्वी बदलापूर गावातील अमृत टॉवर येथे राहायला आले होते.


शनिवारी रात्री अंदाजे ११ ते साडे अकराच्या सुमारास त्याच सोसायटीतील गार्डन मध्ये राजवीर खेळत होता. तेथे असलेल्या पोलच्या वायर ह्या उघड्यावर असल्याचे समजते. तो खेळत असताना याच पोलवर राजवीरचा तोल गेल्याने त्याला वायरचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांनी त्याला शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिल्याने ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासल्यावर त्याला मृत घोषित केले.



त्यामुळे संतापलेल्या लोखंडे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी जोपर्यंत उघड्यावर ठेवलेल्या वायरच्या संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर मृतदेह ताब्यात घेतला.

Comments
Add Comment