वसईतील नायगाव परिसरात राहणाऱ्या 42 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू
वसई: मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मुंबई पाठोपाठ ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना, आता वसई-विरार शहरामध्येही सतर्कतेचे इशारे देण्यात आले आहेत. नुकताच वसई पूर्वेच्या भागात 42 वर्षीय एक करोना बाधित रुग्णाची मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या रोगाशी लढण्यासाठी वसई विरार महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
भविष्यात वसई-विरारमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढून बेताची परिस्थिती निर्माण होण्यापेक्षा आधीच सावधानतेचा पवित्रा महापालिका घेताना दिसून येत आहे. वसई विरार महापालिका आयुक्त आणि प्रशासक अनिलकुमार पवार यांनी सांगितले की, संभाव्य संकटाला सामोरे जाण्यासाठी महापालिकेची आरोग्य व्यवस्था पूर्णपणे सज्ज आहे.मुंबई-ठाण्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने वसई-विरार महापालिका सतर्क
वसईतील नायगाव परिसरात राहणाऱ्या 42 वर्षीय विनीत विजय किणी यांचा करोनासदृश आजारामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांपासून आजारी असलेले किणी यांना करोनाची संशयास्पद लागण झाल्यानं मुंबईतील रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. (Covid-19) विनीत किणी यांना काही दिवसांपासून तब्येतीची तक्रार होती. त्यानंतर तपासणीमध्ये त्यांना संशयित करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तातडीने त्यांना रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा काल शुक्रवारी रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला. आज त्यांचा मृतदेह राहत्या घरी न आणता मुंबईतच अंतिमसंस्कार करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग काहीसा नियंत्रणात आला असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे असतानाच पुन्हा अशा घटनांमुळे वसई-विरार परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. लक्षणे सौम्य असली तरी करोनाचा धोका पूर्णतः टळलेला नसून नागरिकांनी अजूनही योग्य काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.आरोग्य विभागाद्वारे वसई विरामध्ये विविध उपाययोजनेला सुरुवात
महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने संपूर्ण शहरात आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये महापालिकेच्या रुग्णालयांसह नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, 'आपला दवाखाना', आयुष्मान हेल्थ सेंटर, लोकवस्तीची ठिकाणे तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत ५,५११ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे, त्यापैकी ९६ जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली असून फक्त एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्याला तातडीने उपचार देऊन रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
याशिवाय, संभाव्य रुग्णांसाठी विशेष आयसोलेशन सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. २५ आयसोलेशन बेड जीवदानी रुग्णालय, चांदनसर, वसई येथे तर आणखी २५ बेड्स फादरवाडी रुग्णालय, बसई (पूर्व) येथे ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी पाच ऑक्सिजन प्लांट्स कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत. कोणत्याही आपत्कालीन स्थितीत ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.
महापालिकेने शासकीय तसेच खासगी रुग्णालयांकडून कोविडसदृश लक्षणांसह येणाऱ्या रुग्णांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच आयुक्त पवार, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवडे आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली एक संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत महापालिकेने आतापर्यंत राबवलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला तसेच नवीन निर्देश व धोरणे ठरवण्यात आली.
राज्यभरात कोरोनाचे किती रुग्ण सक्रिय?
महाराष्ट्रात मे महिन्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत २८ मे रोजी ३६ नवीन रुग्ण आढळले असून, एकट्या मे महिन्यात ३४६ प्रकरणे नोंदली गेली आहेत. राज्यभरात जानेवारीपासून एकूण ५२१ रुग्ण आढळले असून यातील २१० रुग्ण सध्या सक्रिय आहेत. ठाणे आणि पुण्यासारख्या शहरी भागातही रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांना मास्क वापरणे, हात धुणे आणि लक्षणे आढळल्यास तात्काळ तपासणी करणे याचे आवाहन केले आहे.






