एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन!

  102

वर्षा फडके-आंधळे : उपसंचालक (वृत्त),माहिती व जनसंपर्क संचालनालय


रतीय इतिहासात मोठी युद्धे झाली, साम्राज्ये उभी राहिली आणि कोसळली. परंतु, या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या कार्याने समाजहित, धर्मरक्षण आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च मान दिला, त्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्थान अग्रभागी आहे. त्यांच्या जीवनकार्याने सिद्ध केलं की एका स्त्रीचं नेतृत्व केवळ राजसिंहासनापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकतं. अहिल्याबाई होळकर या केवळ इंदूरच्या होळकर घराण्याच्या राणी नव्हत्या तर त्या एक द्रष्ट्या प्रशासक, न्यायप्रिय नेत्या, धर्मपरायण समाजसुधारक आणि स्त्री सक्षमीकरणाच्या आद्य पुरस्कर्त्या होत्या. त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त, त्यांचे स्मरण त्यांच्या विचारांमधून नव्याने प्रेरणा घेण्याचे निमित्त आहे!


प्रशासन, सामाजिक कार्यात अग्रेसर


अहिल्याबाई होळकर यांचे नेतृत्व केवळ राज्यकारभारापुरते मर्यादित नव्हते, तर त्यात धर्म, न्याय, लोकसेवा आणि नीतीमूल्यांचे सखोल अधिष्ठान होते. त्यांनी महेश्वरला आपली राजधानी बनवली. ही राजधानी एक आदर्श प्रशासनाचे प्रमाण होते. अहिल्याबाई दररोज प्रजेसोबत संवाद साधत. हे त्यांचे कार्य आजच्या लोकशाही व्यवस्थेलाही मार्गदर्शक ठरावे असेच आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य धार्मिक स्थळांचे पुनरुज्जीवन आणि समाजकल्याण यासाठी वाहिले. काशी विश्वनाथ, गंगाघाट, रामेश्वरम, सोमनाथ, द्वारका अशा अनेक प्राचीन आणि पवित्र स्थळांचे जीर्णोद्धार करून त्यांनी भारतीय सांस्कृतिक एकात्मतेचे धागे पुन्हा मजबूत केले. त्यांच्या या पुढाकारामुळे हजारो लोकांना निवारा, अन्न आणि आधार मिळाला. त्यांचे हे सामाजिक कार्य आजही संपूर्ण भारतात “लोककल्याणकारी राज्यशासनाचा” आदर्श नमुना मानले जाते. प्रशासन आणि समाजकारण यांचा असा सुरेख मिलाफ क्वचितच इतिहासात पाहायला मिळतो. त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर!


स्त्री सक्षमीकरणाचे आदर्श!


अठराव्या शतकातील भारतात स्त्रियांना घराच्या चार भिंतींपलीकडे जाण्याची मुभा नव्हती. पण अशा काळातही अहिल्याबाई होळकर यांनी स्त्रिया आत्मनिर्भर बनाव्या यासाठी पुढाकार घेतला. त्या काळात त्यांनी सुरू केलेला महेश्वरी साडी उद्योग केवळ व्यवसाय नव्हता तर तो एक सामाजिक क्रांतीचा भाग होता. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी काशी आणि इतर ठिकाणांहून कुशल विणकरांना महेश्वरला बोलावले. त्यांनी स्थानिक महिलांना हातमाग प्रशिक्षण दिले, आणि महिलांना घरोघरी बसून उत्पन्न मिळवण्याची संधी निर्माण केली. १३ ऑगस्ट १७९५ रोजी या महान राणीने देहत्याग केला. धर्मशाळा, भजनमंडळे, सार्वजनिक पाणवठे आणि शिक्षणाच्या सुविधा त्यांनी महिलांसाठी खुल्या केल्या. त्या काळात जेव्हा स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान होते, तेव्हा त्यांनी महिलांना धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची मुभा दिली. भारत सरकारने त्यांच्या स्मृतींना वंदन म्हणून टपाल तिकीट प्रकाशित करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला आहे. इ.स. १७६७ साली त्यांनी महेश्वर येथे हातमाग उद्योग सुरू करून एक स्थायिक, गुणवत्ताधिष्ठित आणि बाजारपेठेचा विचार करणारा स्थानिक उद्योग उभारला. यामागील हेतू होता तो स्त्रियांना उपजीविकेचा मार्ग उपलब्ध करून देणे आणि महेश्वरला धार्मिक व पारंपरिक वस्त्रकलेचे केंद्र बनवणे. महेश्वरी साडी आणि अहिल्याबाई यांचे नाते केवळ वस्त्रनिर्मितीपुरते मर्यादित नाही, तर ते महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक उद्योगाचा उत्कर्ष यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे.


महेश्वरी साड्यांची क्रेझ आजही कायम!
महेश्वरी साड्या हलक्या आणि देखण्या ·सूती किंवा सिल्क-कॉटन मिश्र धाग्यांपासून तयार होतात, त्यामुळे साडी नेसण्यास हलकी. साड्यांची किनारी(जरी पट्टा) अतिशय आकर्षक आणि पारंपरिक नक्षीकामाने सजलेली असते. “रिर्व्हसिबल बॉर्डर” म्हणजेच दोन्ही बाजूंनी वापरता येणारी साडी ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. ·भारतातच नाही तर विदेशात ही प्रसिद्ध · हस्तकला आणि महिला उपयोजनता याचे प्रतीक... ·अहिल्याबाईंनी त्याकाळी फक्त उद्योग उभारला नाही, तर महिलांना कामात समाविष्ट करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवले. आजही महेश्वर येथील अनेक महिलांचे कुटुंब महेश्वरी साड्या विणण्यावर आधारित आहे.


महिला उद्योजिकांसाठी प्रेरणास्रोत!
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिशतकी जन्मजयंती साजरी करताना त्यांच्या दूरदृष्टीने घडवलेल्या उपक्रमांचा आजच्या काळातही प्रभाव दिसतो. महेश्वरी साडी उद्योग हे त्याचे अत्यंत प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी स्थापलेला हा स्थानिक उद्योग आजही महिला सक्षमीकरणाचा आदर्श मॉडेल मानला जातो. अहिल्याबाईंच्या कार्यातून मिळणारा मूलभूत धडा म्हणजे, कोणताही व्यवसाय फक्त नफा मिळवण्यासाठी नसावा, तर तो समाजातील दुर्बल घटकांना सक्षम करण्याचे साधन असावे. त्यांची ही दूरदृष्टी आजच्या स्टार्टअप महिला उद्योजिकांसाठी मार्गदर्शक ठरते. आज महेश्वरी साडी जगभरात प्रसिद्ध आहे, पण तिच्या प्रत्येक धाग्यामागे पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे स्वप्न, दूरदृष्टी आणि स्त्रीच्या सन्मानासाठी दिलेले योगदान विणलेले आहे.


या ऐतिहासिक वारशाला आदरांजली वाहत, राज्य सरकारने ७ मे २०२५ रोजी अहिल्याबाईंच्या जन्मस्थळी, चोंडी (जि. अहमदनगर) येथे पार पडलेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी “आदिशक्ती अभियान” राबविण्याचा निर्णय घेतला. या अभियानाचा उद्देश म्हणजे महिलांना आरोग्य, पोषण, शिक्षण, आर्थिक सबलीकरण, सामाजिक सहभाग आणि नेतृत्व विकासाच्या माध्यमातून सशक्त करणे आहे. तसेच बालमृत्यू व मातामृत्यू कमी करणे, महिलांचा पंचायतराजमध्ये सहभाग वाढवणे, बालविवाह व कौटुंबिक हिंसाचारास प्रतिबंध करणे, अशा अनेक महत्त्वपूर्ण बाबी यामध्ये समाविष्ट आहेत.


या अभियानाचे मूळ बीज पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या विचारांमध्येच आहे – स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नसून, ती समाजाच्या पुनर्बांधणीची शक्ती आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राबवले जाणारे ‘आदिशक्ती अभियान’ हे स्त्रीसन्मान, स्त्रीसशक्तीकरण आणि सामाजिक परिवर्तनाचे आधुनिक रूप आहे.

Comments
Add Comment

विदर्भात सार्वजनिक उत्सवांना प्रारंभ

श्रावण महिन्यात घरोघरी सणांची रेलचेल असते तर भाद्रपद सुरू झाला की सार्वजनिक उत्सव मोठ्या प्रमाणात होताना

फूड प्रोसेसिंग-तंत्र, कौशल्य आणि व्यवस्थापन

सुरेश वांदिले मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांमुळे फूड प्रोसेसिंग(अन्नप्रकिया)उद्योग

पर्यटनस्थळावरील उपकर म्हणजे शाश्वत पर्यटनात सहभाग

- मधुसूदन जोशी पर्यटन हे आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एक आवश्यक साधन आहे. पर्यटनावर कितीतरी व्यवसाय,

जरांगेंच्या भाषेबाबत मराठवाड्यात नाराजी

- डॉ . अभयकुमार दांडगे  मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी

भाजपने केला विजयाचा फार्म्युला सेट

पुणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, महापालिकेच्या निवडणुका या दिवाळीनंतर होणार असल्याचे सांगितले जात

महापुराचे संकट तूर्तास टळले, नुकसान अटळ!

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्हे कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नद्यांच्या खोऱ्यात वसलेले