Sunday, October 26, 2025
Happy Diwali

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई द्या : रामदास चारोस्कर

दिंडोरी : दिंडोरी व पेठ तालुक्यात गेल्या महिनाभरापासून वादळी वार्‍यासह सुरु असलेल्या अवकाळी पावसाने कांदा, भाजीपाला, आंब, टोमॅटो तसेच बेदाणा शेड, घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभुमिवर माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जावून पाहणी केली. शेतकर्‍यांचे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्वरीत नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी केली आहे.

दिंडोरी व पेठ तालुक्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाला. यात अनेक वृक्ष उन्मळून पडले तर विजेचे खांब कोसळले. त्याचप्रमाणे घराांसह गोदामावरील पत्रे उडाले, आंबा, कांदा, भोपळा, दोडका, कारले, आदी भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच बेदाणा शेड, शेडनेट, मचिंग पेपर हे हवेने उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. शेतकर्‍यांनी शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. त्याचप्रमाणे काही गहू काढणीचे बाकी आहे. ते वादळी वार्‍याने आडवे पडले आहेत. तसेच खळ्यावर काढून ठेवलेला गहूही भिजला आहे. त्यामुळे लाखो नुकसान झाले आहे. अगोदरच शेतीमालाला दर नसल्याने सुल्तानी संकटाचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

एकीकडे बँक, सोसायटीचे कर्जाची रक्कम उभी कशी करायची? अशी विवंचना असतानाच अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचेे जगणे असह्य केले आहे. तसेच ठराविक कालावधीनंतर पावसाच्या हजेरीमुळे शेती व्यवसायाची पुरती वाट लागली आहे. या पार्श्‍वभुमिवर माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जावून शेतीपिकांची पाहणी केली. यात शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. शेतकर्‍यांचे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्वरीत नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी केली आहे.

Comments
Add Comment