
मुंबई| उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे धाराशिव करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार, भारतीय रेल्वेने या रेल्वे स्थानकाचे नाव धारशिव रेल्वे स्टेशन असे अधिकृतरित्या बदलले आहे. या स्थानकाचे नामकरण करण्यासाठी मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) ३१ मे रोजी रात्री ११.४५ वाजल्यापासून मध्यरात्री १.३० पर्यंत बंद ठेवण्यात आले. त्यामुळे सोलापूर विभागातील प्रसिद्ध असलेल्या उस्मानाबाद स्थानकाला आता धारशिव रेल्वे स्थानक असे संबोधले जाणार आहे.
परिणामी, नवीन स्थानकाचे नाव आणि कोड भारतीय रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशनद्वारे मंजूर करण्यात आले आहे.
कोड इनिशियल्समध्ये देखील बदल
पूर्वी स्टेशन कोड UMD असलेले उस्मानाबाद म्हणून ओळखले जाणारे स्थानक आता अधिकृतपणे धाराशिव असे नवीन स्थानक कोड DRSV सह बदलण्यात आले आहे. धाराशिव’ हे नवीन नाव मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये दर्शवले जाणार आहे. त्यानुसार, स्थानकाचे नवीन नाव पुढील पद्धतीने वाचले आणि लिहिले जाईल.
देवनागरी लिपीत (मराठी) : धाराशिव
देवनागरी लिपीत (हिंदी) : धाराशिव
रोमन लिपीत (इंग्रजी) : DHARASHIV
नवीन नाव प्रतिबिंबित करण्यासाठी सर्व रेल्वे रेकॉर्ड, चिन्हे, घोषणा आणि प्रवासी माहिती प्रणाली अद्यतनित केल्या जातील. प्रवाशांना आणि सामान्य जनतेला या बदलाची नोंद घेण्याची विनंती आहे.