Friday, October 24, 2025
Happy Diwali

पाणीटंचाईने अनेकांचे बुडाले रोजगार

पाणीटंचाईने अनेकांचे बुडाले रोजगार

३७ गाव पाड्यांना १२ टँकरने पाणीपुरवठा

मोखाडा : गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात धुवांधार पाऊस पडल्याने ओहोळ, नाले तुडुंब भरून वाहत होते. त्यामुळे पाणी टंचाईग्रस्त गावांच्या विहीरीत पाणी उपलब्ध होऊन टॅँकर ना विश्रांती मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु आजही तालुक्यातील ३७ गाव पाड्याना १२ खाजगी टँकरद्वारे दररोज पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावत असलेले पाणी टंचाईचे दृष्टचक्र थांबायचे नाव घेत नाही. तर शासनांची पाणी टंचाई निर्मुलनासाठी महत्त्वकांक्षी ठरणारी जलजिवन मिशन योजना घराघरात जरी पोहचलेली नसली तरी देखील ४ गाव पाड्यातील विहीरीत नळाद्वारे पाणी सोडून नागरिकांना दिलासा दिला जात आहे.

त्यामुळे एकीकडे कायमस्वरूपी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून करोडो रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. तसेच या पाणीटंचाईच्या दृष्टचक्रातून नागरिकांची सुटका कधी होईल अशी चर्चा होताना दिसत आहे. तसेच पाणीटंचाईमुळे नागरिकांना रोजगाराच्या कामांवर पण जाता येत नाही. टँकर पाणी घेऊन कधी येईल आणि आल्यानंतर विहीरीतील सोडलेले पाणी संपले तर मग काय करायचे या विचारांमुळे अनेकदा हातची कामे सोडून दिल्याचे नागरिक सांगतात. यामुळे पाणी टंचाईने अनेकांचे रोजगार बुडाले आहेत.

Comments
Add Comment