Sunday, August 24, 2025

GDP : भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार कामगिरी

GDP : भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार कामगिरी

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अखेरच्या तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी करताना दिसली आहे. या कालावधीत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) तब्बल ७.४ टक्के वाढ नोंदवण्यात आली. ही वाढ मागील चार तिमाहींमधील सर्वात उच्चांकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर संपूर्ण आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी एकूण जीडीपी वाढ ६.५ टक्क्यांवर स्थिरावली. या आकडेवारीची अधिकृत घोषणा राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) आणि सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने आज, शुक्रवारी केली.

जरी तिमाहीत अर्थव्यवस्थेने चांगली कामगिरी केली असली, तरीही संपूर्ण वर्षासाठीची ६.५ टक्के वाढ ही मागील चार वर्षांतील सर्वात कमी नोंदवली गेलेली जीडीपी वाढ आहे. यापूर्वी २०२१-२२ या वर्षात जीडीपी वाढ ९.७ टक्के होती, तर २०२२-२३ मध्ये ७.६ टक्के आणि २०२३-२४ मध्ये ९.२ टक्के वाढ झाली होती. या तुलनेत चालू वर्षातील वाढ कमी असली तरी काही क्षेत्रांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे.

विशेषतः कृषी क्षेत्राने या आर्थिक वर्षात ४.६ टक्क्यांची वाढ नोंदवली असून, ही वाढ मागील वर्षीच्या २.७ टक्क्यांच्या तुलनेत खूपच सकारात्मक मानली जात आहे. त्याचबरोबर या वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कृषी क्षेत्रातील वाढ ५.४ टक्के इतकी झाली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ०.९ टक्क्यांनी अधिक आहे.

बांधकाम क्षेत्रानेही चांगली कामगिरी करत यावर्षी ९.४ टक्के वाढ गाठली. त्याचप्रमाणे सार्वजनिक प्रशासन, संरक्षण आणि इतर सेवा क्षेत्रांनी ८.९ टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. वित्तीय सेवा, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवा क्षेत्रांची वाढ ७.२ टक्क्यांवर पोहोचली आहे. या सर्व क्षेत्रांतील सुधारणा ही एक सकारात्मक संकेत मानली जात आहे.

जागतिक स्तरावर अमेरिका आणि इतर देशांच्या टॅरिफ धोरणांमुळे तसेच रशिया-युक्रेन युद्धामुळे व्यापारात अडथळे निर्माण झाले. तरीही भारतात ग्रामीण भागातील वाढती मागणी आणि सरकारी खर्चातील वाढ यामुळे अनेक आव्हानांवर मात करत भारतीय अर्थव्यवस्थेने आपले अस्तित्व ठामपणे टिकवून ठेवले आहे. त्यामुळे आगामी तिमाहींसाठी अर्थव्यवस्थेचा वेग असाच टिकून राहण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment