प्रवक्त्यांना रडायला पाठवलं, उद्धव ठाकरेंची राजकीय घसरण?

मोलें घातलें रडाया । नाहीं असुं आणि माया ॥१॥
तैसा भक्तीवाद काय । रंगबेगडीचा न्याय ॥ध्रु.॥
वेठी धरिल्या दावी भाव । मागें पळायाचा पाव ॥२॥
काजव्याच्या ज्योती । तुका म्हणे न लगे वाती ॥३॥


याचा अर्थ असा की, एखाद्याला पैसे देऊन फक्त रडावयास सांगितले तर तशी कृती करताना त्याच्या डोळ्यात अश्रू नसतात आणि माया ही नसते. कारण त्याला पैसे देऊन रडण्यास सांगितलेले असते. तसे अंतकरणात हरी विषयी काहीच प्रेम नाही आणि हरिभक्ती ही नाही आणि हरिकथा करण्यास तो बसलेला आहे त्याचे असे असणे म्हणजे जसे बेडग्याच्या रंगाप्रमाणे फक्त वरती वरती सुंदर असणे असेच असल्याप्रमाणे आहे. एखाद्या मनुष्याला बळेच काम करण्यास सांगावे आणि ते काम झाल्यावर त्याने लगेच मागे पळून जावे, त्याप्रमाणे ते ढोंगी असतात... सांगण्याचा मुद्दा हा की २०२४ च्या विधानसभेतील लाजिरवाण्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंच्या गटात एकच काम सुरू आहे.. रडणं, आणि प्रसारमाध्यमांत जाऊन "माझा पक्ष, माझा बाप, माझा वारसा, माझी शिवसेना" असं ओरडत खोटा भाव खाणं.. आज चित्र असं आहे की, उद्धव ठाकरेंना पक्ष वाचवायचाय, पण कार्यकर्तेच नाहीत... जनतेचा पाठिंबा नाही... आणि निष्ठावंतही आता मूळ शिवसेनेच्या गोटात परतलेत. मग उरलाय तो "पब्लिक सिम्पथीचा नाटकबाज खेळ. त्यासाठीच उद्धव ठाकरेंनी आता त्यांच्या निष्ठावंत प्रवक्त्यांना मोलें घातलें रडाया! काय आहे हा प्रकार चला जाणून घेऊ या..





संजय राऊत, सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर, हर्षल प्रधान हे आता उद्धव सेनेचे राजकीय भोंगे झालेत. कोणी पत्रकार परिषदेत रडतो, कोणी निवेदनांतून, कोणी लेखातून... आणि महाराष्ट्राच्या जनतेला वाटतंय की हे लोक राजकारण करतायत की टीव्ही सिरियल?


राऊत उघडपणे मीडियावर जाऊन रडतो. सुषमा अंधारे व्याख्यानांमध्ये अश्रू गाळते. आणि आता नवीन "रडत राऊत" म्हणजे हर्षल प्रधान.. त्यांनी २९ मेच्या लोकसत्तेत ‘एकनाथ भाई’ नावाने भावनिक लेख लिहिलाय.


ज्यांना गेल्या वर्षभरात गद्दार, मिंधे, धोकेबाज म्हणत होते, तोच गट आज त्यांना ‘भाई’ का म्हणतोय? त्याचं कारण स्पष्ट आहे.. शांत डोक्याने एकनाथ भाईंनी उद्धव सेनेची गळचेपी केलीय. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली "ऑपरेशन शिकार ए कागदी वाघ" राज्यभर सुरूय. उद्धव सेनेत उरलेले कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक आता मूळ शिवसेनेत परतत आहेत. दापोलीचा ताजा प्रसंग.. सगळी सत्ता उद्धव सेनेकडून मूळ शिवसेनेत गेली. सत्तांतर पूर्ण झालं.


आज उ.बा.ठा. गटात उरलेयत तेच ते नवरत्न – आदित्य ठाकरे, वरुण सरनाईक, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, अंबादास दानवे, अरविंद सावंत, सुनील प्रभू, आणि संजय-सुनील राऊत. बाकी सगळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत. त्यामुळे उद्धव गटाला आज पक्ष संपुष्टात येण्याची खरी भीती वाटतेय. आणि ही भीतीच त्यांच्या लेखांमध्ये, भाषणांमध्ये आणि प्रतिक्रिया देण्यातून ठळकपणे दिसते.


हर्षल प्रधान यांचा लोकसत्तेतील लेख वाचला की जाणवतं, हा लेख म्हणजे शब्दांचा खेळ, बोलाची कढी आणि बोलाचा भात! शब्दांचे मोठाले डोंगर उभे करून महायुती सरकारवर आरोप करण्याचा प्रयत्न, पण तथ्य शून्य. आजचं सत्य हे आहे की, महाविकास आघाडी सरकार असताना जे भ्रष्टाचाराचं रसायन उकळलं जात होतं, ते थांबलंय. डिनो मोरिया, संजय राऊत यांच्यावरील चौकशा हे पुरावे आहेत. आणि हेच लक्ष विचलित करण्यासाठी आज उद्धव गटाला 'भावनिक लेख', 'भावनात्मक भाषणं', आणि 'खोटा प्रचार' करावा लागतोय.


उद्धव ठाकरे यांच्या पक्षात न विचारधारा उरली आहे, न जमेची बाजू. त्यामुळे एकच पर्याय उरलाय.. मोले घालून रडायचं.. आणि मीडियाला वापरून लोकांच्या सहवेदनेचा आधार घ्यायचा.. पण महाराष्ट्राची जनता भावनिक ब्लॅकमेलिंगला आता बळी पडणारी नाही. त्यांना काम करणारे नेता हवे आहेत.. आणि ते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे..


उ.बा.ठा. गटाचं हे शेवटचं राजकारण चालू आहे आणि ते ही केवळ "रडारड करून"! पक्षप्रमुख म्हणून स्वतः टोमण्यांच्या भाषेत रडणाऱ्या उद्धव ठाकरेंनी काही भोंग्यांना प्रसार माध्यमांमध्ये जाऊन रडण्याचे आदेश दिलेत असे स्पष्ट दिसून येते. संजय राऊत आणि सुषमा अंधारे हे इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर जाऊन रडारड करत असतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचे मनोरंजन तर होते परंतु त्याने उ.बा.ठा.चा काहीच फायदा होत नाही असे दिसून आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी हर्षल प्रधान नावाचा आपला एक रडत राऊत लोकसत्ता सारख्या काही वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिण्यासाठी रडायला पाठवला आहे. आता लोकसत्ता, संपादक गिरीश कुबेरांच्या माफीनाम्याकरता कुप्रसिद्ध आहे, आणि तेव्हापासून त्याचा खप लयाला गेला आहे हे जगजाहीर आहे. शिवाय लोकसत्ता काँग्रेसचे मुखपत्र असल्यासारखे वागते हेही आता लपून राहिलेले नाही. चिदंबरम सारखे केंद्रीय नेते भ्रष्टाचारामुळे जेल यात्रा करून आल्यानंतर नियमितपणे लोकसत्ता मध्ये लिहू लागले. त्यांच्या या साळसूदपणे लिहिण्याला कोणी गंभीरपणे घेत नाही हा भाग वेगळा. तसंच काहीसं उद्धव ठाकरेंचं झालं आहे. निवडणूक हरल्यानंतर आणि जनमत संपूर्णपणे विरोधात गेल्यामुळे उद्धव ठाकरे हे निराश झालेत. त्यामुळे त्यांनी हर्षल प्रधान यांना "मोलें घातलें रडाया" असे म्हणावे लागेल.

Comments
Add Comment

शीव रेल्वे स्थानकाजवळील पोहोच रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने शीव (सायन) रेल्वे स्थानक परिसरात सुमारे १३ किलोमीटर लांबीचा

दहिसर आणि बोरीवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली जलाशयाचे बांधकाम झाले जुने; महापालिका तातडीने घेणार दुरुस्तीचे काम हाती

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना