Tuesday, June 17, 2025

मान्सूनचा वेग मंदावला

मान्सूनचा वेग मंदावला
मुंबई : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागात मान्सूनने आगमन केलं. यंदा मान्सूनच्या आगमनासोबतच पावसाने राज्यात धुमाकूळ घातला. मान्सून दाखल झाल्यानंतर मात्र त्याचा वेग मंदावला. यामुळे पाऊस ओसरण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. येत्या २४ तासात विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर राज्यातील उर्वरित भागात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आङे. यामुळे डीप डिप्रेशन सक्रीय झाले आहे. गुरुवारी हे डीप डिप्रेशन बांगलादेशमधील सागर बेटे आणि खेपूपारा इथं पोहोचले. याची तीव्रता हळूहळू कमी होणार आहे. गुरुवारी सकाळपर्यंत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रासह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

शुक्रवारी विदर्भातल्या अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. मराठवाड्यातल्या बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात वीजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात मान्सून पुढे सरकला आहे. पण अरबी समुद्रात मान्सूनचा वेग मंदावला आहे. गुरुवारी विदर्भासह छत्तीसगड, ओडिशाचा काही भाग आणि पूर्वोत्तर राज्यांसह सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात मान्सून दाखल झालाय. पूर्व भारतात मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे. तर महाराष्ट्रात मान्सून पुढे सरकरण्यासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे.
Comments
Add Comment