चंदिगड : आयपीएल २०२५ चे सर्व साखळी सामने संपले आहेत. आता मुख्य टप्पा सुरू झाला आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता चंदिगडमध्ये क्वालिफायर १ होणार आहे. या सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने असतील. या सामन्यातील विजेता थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. तर पराभूत संघाला एलिमिनेटरच्या विजेत्यासोबत क्वालिफायर २ मध्ये खेळावे लागेल. क्वालिफायर २ चा विजेता फायनलमध्ये क्वालिफायर १ च्या विजेत्या विरुद्ध मैदानात उतरेल. फायनल जिंकणारा संघ आयपीएल २०२५ चा विजेता होईल.
भारतीय वेळेनुसार आज म्हणजेच गुरुवार २९ मे रोजी क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने असतील. उद्या म्हणजेच शुक्रवार ३० मे रोजी एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने असतील. दोन्ही सामने संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होतील. हे दोन्ही सामने चंदिगडच्या न्यू पीसीए स्टेडियममध्ये होणार आहेत.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायर २ आणि फायनल होणार आहे. भारतीय वेळेनुसार रविवार १ जून रोजी क्वालिफायर २ आणि मंगळवार ३ जून रोजी फायनल होणार आहे. दोन्ही सामने संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होतील. या दोन्ही मॅचचे प्रतिस्पर्धी अद्याप ठरलेले नाहीत.