Wednesday, June 18, 2025

आयएचएममध्ये करिअरच्या अफाट संधी...

आयएचएममध्ये करिअरच्या अफाट संधी...

प्रतीक घोष : विभागप्रमुख, डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, चंदिगड


ज्ञान भूषण : (आयईएस), एनसीएचएमसीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी


जागतिक हॉस्पिटॅलिटी (आदरातिथ्य) उद्योग नव्या ऊर्जेने विस्तारत असताना, भारत हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कुशल व्यावसायिकांचे पॉवरहाऊस (पुरवठादार) बनण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या देशभरातली हॉटेल मॅनेजमेंट संस्था (आयएचएम) या चळवळीमध्ये आघाडीवर आहे. भारतात हॉस्पिटॅलिटी उद्योगामधील शिक्षणाचा प्रवास १९५४ साली एका धाडसी दृष्टिकोनातून सुरू झाला, त्यावेळी आयएचएम मुंबई, ही आशियातील अशा प्रकारचे शिक्षण देणारी पहिली संस्था होती. लीलावती मुन्शी यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय महिला केंद्रीय अन्न परिषदेने या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला, दुष्काळामध्ये सर्वसामान्यांना परवडण्याजोगे पोषण उपलब्ध करून देणाऱ्या अन्नपूर्णा रेस्टॉरंट्समधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने, ही संस्था मुंबईतील भवन्स कॉलेजमधील लष्कराच्या बॅरेकमध्ये केवळ सहा विद्यार्थ्यांसह सुरू झाली. सी. बेलफिल्ड स्मिथ आणि थंगम ई. फिलिप यांच्यासारख्या धुरिणांच्या पाठबळाने, ही संस्था झपाट्याने नावारूपाला आली. त्यानंतर या संस्थेने १९५८ साली, आपला मान्यताप्राप्त ३ वर्षांचा पदविका अभ्यासक्रम सुरू केला आणि कालांतराने आपल्या दादर इथल्या प्रतिष्ठित कॅम्पसमध्ये स्थलांतरित झाली. १९७९ पासून केंद्र सरकारच्या पूर्ण पाठबळाने आणि राष्ट्रीय हॉटेल व्यवस्थापन आणि केटरिंग तंत्रज्ञान परिषदे (NCHMCT)अंतर्गत कार्यरत असलेल्या आयएचएम मुंबईने हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या राष्ट्रीय नेटवर्कचा पाया रचला.


आज आधुनिक पायाभूत सुविधा, जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त अभ्यासक्रम आणि मजबूत औद्योगिक संबंधांसह, आयएचएम दरवर्षी १३,००० हून अधिक विद्यार्थ्यांना पदविका, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर कार्यक्रमांचे प्रमाणपत्र प्रदान करते, जे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील जवळजवळ सात दशकांच्या सर्वोत्तम कामगिरीचे निदर्शक आहे. उत्कृष्टतेचा वारसा, व्यावहारिक प्रशिक्षण आणि जागतिक दर्जाचे व्यावसायिक विकसित करण्याची वचनबद्धता, ही या संस्थांची ओळख आहे. इथे प्रशिक्षण घेण्यासाठी येत्या शैक्षणिक सत्रासाठीचे प्रवेश आता सुरू झाले आहेत, त्यामुळे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात उत्तम करिअर करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही संधी दवडता कामा नाही. पद्मश्री संजीव कपूर, शेफ मनजीत गिल, पुनीत चटवाल, रंजू अ‍ॅलेक्स, पद्मश्री शेफ दामू यांच्यासारख्या अनेक व्यावसायिकांनी आयएचएमचा दिमाखदार वारसा जपला आहे. खरं तर, ही यादी एवढी समृद्ध आणि मोठी आहे की, ती अशीच पुढे नेता येईल, ज्यामध्ये ‘मिशेलिन स्टार’ मान्यताप्राप्त अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. राष्ट्रीय प्राधान्यक्रम आणि जागतिक उद्योगाच्या मागण्यांशी अधिक चांगले जुळवून घेण्याच्या दृष्टीने देशभरातील आयएचएममध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. सरकारी निर्देश आणि उद्योगांकडून मिळालेल्या उपयुक्त सूचनांवरून कालानुरूप बदलांसह, या संस्था पोषक शैक्षणिक वातावरण देत असून, इथे केवळ शिक्षणच नव्हे, तर प्रेरणा देखील मिळते.


उद्योग-शिक्षण सहकार्याला मजबुती


शिक्षण हे औद्योगिक क्षेत्राची गरज भागवणारे असावे, यासाठी आयएचएम, हॉस्पिटॅलिटी उद्योगाबरोबरचे संबंध मजबूत करत आहेत. ही भागीदारी अभ्यासक्रम अधिक कालसुसंगत बनवते, विद्यार्थ्यांना या उद्योगामधील मोलाचा अनुभव मिळवून देते आणि प्लेसमेंट (रोजगार)ची प्रक्रिया सुलभ करते. ताज, मॅरियट, ओबेरॉय, आयटीसी यांसारखे आघाडीचे हॉटेल ब्रँड आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योग, या प्रयत्नात सक्रिय सहयोगी बनले असून, इंटर्नशिप, रोजगार आणि मार्गदर्शनाच्या संधी उपलब्ध करत आहेत. सेंट्रल आयएचएम आणि आघाडीच्या हॉटेल चेनमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे (एमओयू) हे सहकार्य अधिक दृढ झाले असून, विद्यार्थ्यांना प्राध्यापक-उद्योग संवाद, संयुक्त संशोधन आणि प्रत्यक्ष शिक्षणाचा अनुभव यांसारखे सहाय्य लाभत आहे.
या क्षेत्रात काम करण्याची उत्तम क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याची गरज ओळखून, आयएचएमने प्रवेश वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत ते पुढीलप्रमाणे...


शाळा आणि करिअर मेळ्यांमधून माहिती देणारे उपक्रम हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील शिक्षणाचे महत्त्व वाढवण्यासाठी प्रसारमाध्यमांद्वारे जनसंपर्क. डिजिटल माध्यमांचा अधिक वापर, ज्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना अभ्यासक्रमासाठी प्रवेशाबाबत सहज माहिती उपलब्ध होईल. याशिवाय, आयएचएममधील प्रवेश प्रक्रिया (एनसीएचएम जेईई) सुलभ करण्यासाठी, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि विद्यार्थ्यांची सोय या गोष्टी वाढवण्यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्थे (एनटीए)च्या सहयोगाने काम करत आहेत.


प्लेसमेंटचा उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्ड


प्लेसमेंटमधील सातत्यपूर्ण कामगिरीसाठी आयएचएमचे सन्मानाने नाव घेतले जाते. संस्थेत शिक्षण घेणाऱ्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची आघाडीच्या हॉस्पिटॅलिटी चेन, एअरलाइन्स, क्रूझ लाइन्स आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे भरती केली जाते. संस्थेच्या पदवीधरांसाठी उच्च दर्जाच्या नोकरीच्या ऑफर मिळवण्यासाठी आयएचएममधील प्लेसमेंट सेल उद्योगांच्या भरती विभागांशी सक्रियपणे संपर्कात राहतात. उदाहरणार्थ, या वर्षी एआयएचएम चंदीगडने १०० टक्के, ‘वन स्टुडंट वन प्लेसमेंट’ रेकॉर्ड नोंदवला.


प्राध्यापकांचा विकास आणि नवोन्मेष संस्कृती


दर्जेदार शिक्षणाची सुरुवात दर्जेदार शिक्षकांपासून होते. प्राध्यापकांचे अध्यापन या उद्योगाला सुसंगत असावे, यासाठी आयएचएमने आघाडीचे हॉटेल ब्रँड आणि शैक्षणिक संस्थांबरोबर भागीदारीने प्राध्यापक विकास कार्यक्रम सुरू केले आहेत. प्राध्यापकांना अद्ययावत साधने, शैक्षणिक तंत्र आणि हॉस्पिटॅलिटी ट्रेंड्सची माहिती मिळते. ही माहिती ते आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात. याव्यतिरिक्त, आयएचएम विद्यार्थ्यांना स्टार्ट-अप प्रकल्प, संशोधन आणि उद्योजकतेमध्ये सहभागी होण्याचे प्रोत्साहन देऊन, नवोन्मेश आणि नवनिर्मितीची संस्कृती जोपासत आहेत. समर्पित इन्क्युबेशन सेंटर्स फूड टेक्नॉलॉजी, शाश्वत पर्यटन आणि सर्व्हिस इनोव्हेशनमध्ये काम करण्याची क्षमता असलेल्या आश्वासक विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील उपक्रमांसाठी मार्गदर्शन आणि निधी मिळवून देतात.


आयएचएम का निवडावे?


आयएचएमची पदवी ही केवळ एक पात्रता नसून ती प्रतिष्ठित, लोककेंद्रित आणि जागतिक स्तरावर जोडलेल्या व्यवसायाचे प्रवेशद्वार आहे. या संस्थेत विद्यार्थी वास्तविक जगात आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण घेण्याबरोबरच हॉस्पिटॅलिटी, हवाई सेवा, आरोग्यसेवा, किरकोळ बाजार आणि पर्यटन यांसारख्या असंख्य उद्योगांमध्ये लागू होणारी कौशल्ये आत्मसात करतात. आज करिअरच्या सर्वात आकर्षक, वेगवान आणि लाभदायक अशा काही संधी खुल्या करतो.


मग ते लक्झरी हॉटेल्सचे व्यवस्थापन असो, पाहुण्यांसाठी जागतिक दर्जाचा अनुभव डिझाइन करणे असो, आंतरराष्ट्रीय क्रूझ लाइनर्सवर काम करणे असो किंवा तुमचा स्वतःचा कलीनरी, अर्थात खाद्य उपक्रम किंवा इव्हेंट मॅनेजमेंट फर्म चालवणे असो, या उद्योगात अमर्याद संधी आहेत. धोरणात्मक सुधारणा, मजबूत औद्योगिक भागीदारी आणि ‘विद्यार्थी-प्रथम’ या दृष्टिकोनासह, आयएचएम हे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील दिमाखदार कारकिर्दीसाठीचे आदर्श लाँचपॅड आहेत. म्हणूनच, आयएचएमच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे आश्वासक करिअर घडवण्यासाठी वेळेवर कृती करणे फायद्याचे आहे. म्हणूनच, ‘Better three hours too soon than a minute too late’, म्हणजेच, ‘एक मिनिट उशीर होण्यापेक्षा तीन तास लवकर बरे’, हे वाक्य समर्पक आहे.

Comments
Add Comment