Wednesday, May 28, 2025

विशेष लेख

विज्ञानाचा आध्यात्मिक वारकरी

विज्ञानाचा आध्यात्मिक वारकरी

उमेश कुलकर्णी


डॉ. जयंत नारळीकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या प्रयोगांची आता चर्चा सुरू झाली आहे आणि नारळीकर यांनी विज्ञानाला काय दिले याचीही चर्चा सुरू आहे. प्रकांड पंडित, विज्ञानाच्या अनेक पदव्या मिळवलेला तपस्वी, वयाच्या २६ व्या वर्षी पद्मभूषण पुरस्कार मिळवलेला ज्ञानी आणि केंब्रिज विद्यापीठासह अनेक विद्यापीठांतून मोठ्या पदव्या मिळवलेला विज्ञानाचे व्रत अंगीकारलेला शिक्षक असे अनेक प्रकारे त्याचे वर्णन केले गेले. पण डॉ. नारळीकर हे आपल्यामध्ये खराखुरा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे होते. त्यांचे अनेक पैलू समोर आले नाहीत.


वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल त्याना काय वाटायचे याबद्दल त्यांची मुलाखत २०१८ मध्ये घेण्यात आली होती. त्यात नारळीकर यांनी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल काय वाटते हे स्पष्ट करून सांगितले आहे आणि ते प्रत्येकाने कायमचे मनावर कोरून ठेवले पाहिजे. डॉ. नारळीकर म्हणतात की, महाभारत काळात ब्रम्हास्त्र होते असे आपली पुराणे सांगतात. पण त्या काळात वीज होती का, हे मला कोण सांगेल. आज आपल्याला विजेचे आविष्कार दिसतात आणि ते आपण मुलांना सांगतो. पण जेव्हा वीजही नव्हती तेव्हा ब्रम्हास्त्र किंवा पुष्पक विमान कसे असू शकेल असा प्रश्न कुणाच्याही मनात येत नाही. नारळीकर हे आज गेले आहेत म्हणून त्यांचे कौतुक करणारे आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा करणारे अनेक लेख दैनिकांत प्रकाशित झाले आहेत. पण ते असतानाही कुणालाही हे सुचले नाही की, वीज नव्हती त्या काळात ब्रम्हास्त्र किंवा ज्याला छद्मविज्ञानात मान्यता दिली जाते त्या शोधांनी कसे जग काम करत असेल? याचा कुणी विचार करत असेल का?


डॉ. नारळीकर यांनी बिग बँग थिअरीला नवा आयाम दिला आणि ती फ्रेड हॉयल नारळीकर थिअरी म्हणून ओळखली जाते. पण त्यातही वाद करणारे लोक होतेच. आता ती सर्वमान्य झाली आहे. पण खरा वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणारा माणूस दुसरे कोणतेही तत्त्वज्ञान स्वीकारू शकत नाही आणि त्याच्याशी प्रामाणिक राहातो हेच नारळीकर यांच्या जीवनाच सार होते. नारळीकर यांच्याबद्दल बोलताना आपण फारच सिंपलीफिकेशन करतो. नारळीकर यांचा विरोध अध्यात्माला नव्हता. पण त्याचा उपयोग करून भोळ्याभाबड्या लोकांना फसवणाऱ्या आणि त्यांना लुटणाऱ्या साधुमहंतांना होता. डॉ. नारळीकर हे प्रख्यात विज्ञानकथा लेखक होते आणि त्यांच्या कितीतरी विज्ञाम कथा गाजल्या. त्यांच्या या लोकप्रिय साहित्यिक भांडवलावर ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. पण त्यांचा विचार केवळ आपण ते वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे होते याचा न करता ते विज्ञानवादी होते म्हणजे अध्यात्माला न मानणारे होते असा आपण काढतो. महत्त्वाच्या विषयांवर त्यांचे विचार आपण समजून घेत नाहीत. त्यांना केवळ अध्यात्म आणि विज्ञान याच परिघात ठेवतो. पण त्यांनी शाळांमध्ये ग्रंथालये अद्ययावत असावीत आणि मुलांना मराठी म्हणजे त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण दिले जावे, हे त्यांचे विचार विसरून जातो.


डॉ. नारळीकर यांनी विज्ञानाला श्रेष्ठ मानले आहे की नाही, हा गंभीर विषय जाऊ द्या. पण त्यांनी जे मुलांना मराठीतून शिक्षण दिले पाहिजे, म्हणजे तो उत्कृष्ट समजेल हा जो विचार मांडला आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. डॉ. नारळीकर यांनी आपल्या आत्मचरित्रात उत्तम विचार मांडले आहेत. त्यात त्यांनी मुलांना मातृभाषेतून शिक्षण आणि ग्रंथालये सुसज्ज असावीत अशी गरज मांडली आहे. त्यापैकी किती जण त्यांचे हे विचार आत्मसात करतात आणि आत्मसात करणे तर सोडून द्या, पण त्यांचे हे विचार किती जणांना माहीत तरी आहेत हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. अजून आपल्याला माहीत नाही की, विश्वाची उत्पत्ती कशी झाली आणि जीवात्मा कसा आला. डार्विनही हे सांगू शकत नव्हता. तरीही आपण तेच सामान्य विषय काढून वाद घालतो आणि सारे काही आपल्याला ठाऊक असल्यासारखे सांगत बसतो. नारळीकर यांनीही हे आपल्याला सारे काही समजले आहे हे मान्य केले नाही.


पण शाळेत मातृभाषेतून शिक्षण आणि ग्रंथालये सुसज्ज असावीत हे तर साधे विचार आहेत त्यासाठी फार मोठे परिशीलन करायला नको. नारळीकर यांचे म्हणणे होते की, आपण शोधत जायचे आणि आपल्याला काही तरी सापडेल, पण ना अध्यात्माला सर्व काही कळले आहे ना विज्ञानाला. पण आपण जो पक्ष घेतो त्या बाजूने आपल्याला सोयीस्कर युक्तिवाद करतो. त्याने समोरचा नामोहरम होतो. पण शेवटी ते काही अंतिम सत्य नसते. खगोल शास्त्रातील अनेक शोध त्यांनी लावले आणि त्यांना त्यांचा जनक म्हटले जाते. पण आपल्यासारखी बोलघेवडी नव्हे तर खरीखुरी वैज्ञानिक भावना आपल्या तमाम भारतीयांत असावी ही त्यांची भावना होती आणि त्यातूनच त्यांनी विज्ञान प्रसाराचे कार्य केले.


१९७९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या यक्षांची देणगी या त्यांच्या कथासंग्रहाने विज्ञानकथेच्या कक्षा ओलांडल्या आणि त्या बदलल्या. त्यांच्या विज्ञानकथांमुळे मोठा वर्ग विज्ञानाकडे वळला हे सत्य आहे. त्या दृष्टीने त्यांचे कार्य लाखमोलाचे आहे. शास्त्रीय बैठकीसह त्यांनी साहित्य विश्वात विज्ञानाची पणती तेवत ठेवली हे त्यांचे विशेष कार्य आहे. त्यांच्या बिग बँग थिअरीला नवा आयाम देणारे वैज्ञानिक कार्य विज्ञान अभ्यासकाच्या लक्षात येईल, पण त्यांचे इतर जे कार्य आहे ते सामान्य माणसासाठी आहे आणि त्यांचा हेतूच हा होता की विज्ञान साध्या सोप्य भाषेत सर्वांना समजून सांगता यावे आणि लोकांनी त्यावर चर्चा करावी. त्या दृष्टीने त्यांचा हेतू पुष्कळच सफल झाला. नारळीकर हे निःसंशय विज्ञानवादी होतेच. पण ते डोळस विज्ञानवादी होते. त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याने लोकांच्या मनातील संभ्रम वाढला नाही तर तो मिटवण्याचा प्रयत्न केला. त्या दृष्टीने ते अध्यात्माचे विज्ञानवादी वारकरी होते असे म्हणावे लागेल.

Comments
Add Comment