
देवळा : येथील कसमादे भागात अवकाळी पाऊस भाग बदलून बदलून रोजच तसेच दिवसाआड हजेरी लावत असल्याने खरीपपूर्व मशागत कामात मोठा अडथळा निर्माण झाला होता; परंतु गेल्या तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे.
नांगरणी, वखरणी, बांधबंदिस्ती, फळबागांमधील कामे जोरात सुरू झाली आहेत. सामान्यतः मे महिन्यात खरीपपूर्व कामांची तयारी सुरू होते. नांगरणी, ढेकूळ फोडणे, खते टाकणे, बांधबंदिस्ती, फळबागांची पानगळ करणे, औषधे देणे, घरांची-चाळींची डागडुजी करणे आदी कामे केली जात असतात.परंतु यावर्षी अवकाळी पावसाने मे महिन्याच्या मध्यातच हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या कामाचे व शेतीच्या मशागतीचे नियोजन कोलमडले आहे. अद्याप बहुतांश शेतकऱ्यांची नांगरणीसह इतरही मशागतीची कामे बाकी आहेत. शेते ओली असल्याने शेतात खते टाकता येत नाहीत.
उन्हाळ कांदे काढणी झाल्यानंतर शेतांची नांगरणी होऊन उन्हाने त्यातील ओलसरपणा कमी व्हायला हवा होता परंतु या पावसामुळे जमिनीतील ओलसरपणा कायम राहिल्याने पुढील पिकात बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. काहींनी आताच मका पेरणी करण्याची तयारी सुरू केली आहे. तर काहींनी मका पिकाची पेरणी मृग नक्षत्रातच करावी असा आग्रह धरला जात आहे.
डाळिंब फळबागा धोक्यात : डाळिंब फळबागांमध्ये फुलगळ आणि फळगळ या समस्या अवकाळी पावसाने वाढल्या आहेत. अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे डाळिंब भागांमधील फुलगळ होताना दिसत आहे. तर जे शेतकरी उशिरा बहार धरणार होते त्या बागांनी आताच केन फेकून दिली आहे. यामुळे बहार व्यवस्थापनात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
अवकाळी पावसामुळे शेतात तण उगवले असल्याने ऊन पडल्यावर त्याचा नायनाट करण्यासाठी दुसऱ्यांदा मशागत करावी लागत आहे. तणनाशक मारण्याऐवजी मशागतीने तण घालवणे योग्य असते.
- अशोक आहेर, देवळा