
सोलापूर: करमाळा तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. सलग बारा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान (Rain Hits Crops) झाले आहे. तालुक्यातील सर्व आठही मंडळांत मोठा पाऊस झाला आहे. सततच्या पावसाने शेतामध्ये चिखल झाला आहे. पिकांची मुळे सडू लागली आहेत. भुईमुगाच्या शेंगांना कर आले तर टोमॅटो गळून पडले. आंब्याचेही प्रचंड नुकसान झाले आहे. पेरू व डाळिंबाच्या बागांचेही मोठे नुकसान झाले. डाळिंबाच्या कळ्या गळून पडल्या आहेत.
सोलापूरमध्ये आतापर्यंत 258.3 मिलिमीटरचा पाऊस
तालुक्यात झालेल्या पावसाची नोंद तब्बल 258.3 मिलिमीटर आहे. म्हणजेच एक हजार 16 टक्के पाऊस तालुक्यात नोंदला. अर्जुननगर 174.4, केम 294.3, जेऊर 340.3, सालसे 297.7 कोर्टी 249.8 उमरड 340.3, केतुर 200.6 असा या आठ मंडळामध्ये पाऊस झाला. सर्वात जास्त पाऊस जेऊर व उमरड मंडलात नोंदला. याभागात तब्बल 340.3 झाला. सालसेत 297.7 तर केममध्ये 294.3 पाऊस झाला.
तालुक्यातील पश्चिम भागात उमरड, वाशिंबे, पारेवाडी, केतुर याबरोबरच चिकलठाण, कुगाव, शेटफळ, दहिगाव, वांगी परिसरामध्ये डाळिंब, केळी, ऊस, टमाटे, मिरची, ढोबळी मिरची आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. उत्तर भागांमध्ये मांगी, वडगाव, पूनवर, खडकी, आलजापूर, पाडळी, घारगाव, संगोबा आदी ठिकाणी कांदा, केळी, उसाचे मोठे नुकसान झाले. कृषी सहाय्यक संपावर असले तरी महसूल व कृषी विभागाच्या कर्मचार्यांनी अनेक ठिकाणी नुकसान ग्रस्त शेताची पाहणी करून काही ठिकाणी पंचनामेही सुरू केले आहेत.