
गोव्यात आणखी २ युद्धनौका बनवणार
पणजी/मुंबई : भारताची नवीनतम स्टेल्थ क्षेपणास्त्र फ्रिगेट ‘तमाल’ ही युद्धनौका आगामी जून महिन्याच्या अखेरीस रशियातील कालिनिनग्राड येथील यांतर शिपयार्ड येथे औपचारिकपणे भारतीय नौदलात समाविष्ट होणार आहे. संरक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. या बातमीने पाकिस्तानला मात्र चांगलीच धडकी भरली आहे.
यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार तमाल युद्धनौका सप्टेंबरमध्ये भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचेल आणि मुंबईतील वेस्टर्न फ्लीटचा भाग म्हणून सेवा बजावेल. ‘तमाल’ ही रशियाबरोबर करण्यात आलेल्या २.५ अब्ज डॉलर्सच्या करारातील ४ स्टेल्थ फ्रिगेट्सपैकी दुसरी नौका आहे. या करारांतर्गत २ नौका रशियातील यांतर शिपयार्डमध्ये तर उर्वरित २ नौका गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये तयार केल्या जात आहेत. यासाठी रशियाकडून तंत्रज्ञान हस्तांतरण देखील करण्यात येत आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशहिताचे पाच निर्णय घेण्यात आले. यातील एका निर्णयामुळे ...
या करारातील पहिली नौका ‘आयएनएस तुशील’ गेल्या डिसेंबरमध्ये यांतर शिपयार्डमध्ये नौदलात समाविष्ट झाली होती आणि ती फेब्रुवारीत भारतात दाखल झाली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत या युद्धनौकेचे स्वागत करण्यात आले होते. त्यांनी ‘तुशील’चे वर्णन भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्याचे प्रतीक आणि भारत-रशिया मैत्रीचे दृढचिन्ह असे केले होते.
‘तमाल’ आणि ‘तुशील’ या दोन्ही Krivak III वर्गातील सुधारित फ्रिगेट्स आहेत. या ‘प्रोजेक्ट 1135.6’ अंतर्गत तयार करण्यात आल्या असून, आधीपासूनच ६ अशा फ्रिगेट्स भारतीय नौदलात कार्यरत आहेत. यातील ३ ‘तलवार’ वर्ग आणि ३ ‘तेग’ वर्ग फ्रिगेट्स आहेत. नवीन ‘तमाल’ फ्रिगेटमध्ये सुमारे २६ टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाचा समावेश आहे. यापुर्वीच्या ‘तेग’ वर्ग फ्रिगेट्सच्या तुलनेत ही टक्केवारी दुप्पट आहे.
या फ्रिगेटसाठी भारतातील ३३ कंपन्यांनी योगदान दिले आहे. यात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), ब्रह्मोस एरोस्पेस (भारत-रशिया संयुक्त उपक्रम), आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्सची उपकंपनी नोव्हा इंटिग्रेटेड सिस्टीम्स यांचा समावेश आहे.
तसेच युद्धनौकेवर आधुनिक शस्त्रास्त्रांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र, सुधारित श्रेणीची ‘श्तील’ पृष्ठभाग-विरुद्ध-हवा क्षेपणास्त्रे, मध्यम श्रेणीतील तोफा, ऑप्टिकली नियंत्रित जवळच्या अंतरावर झपाट्याने गोळीबार करणारे तोफखाने, टॉरपीडोज आणि रॉकेट्स यांचा समावेश आहे. ‘तमाल’च्या नौदलातील समावेशामुळे भारतीय महासागर क्षेत्रातील भारताची सागरी शक्ती अधिक भक्कम होणार आहे.