
दहिसर पश्चिम येथील दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हिंसक हल्ला प्रकरणी पिडीत हिंदू कुटुंबाला नितेश राणे यांची भेट
दिनांक १८ मे रोजी मुंबईतील दहिसरमध्ये किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत ३ जणांचा मृत्यू झाला. गणपत पाटील नगर झोपडपट्टी भागात रविवारी झालेल्या या तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसर हादरला. ज्यात मृत्यूमुखी पडलेल्या पीडित गुप्ता कुटुंबियांची मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी १८ मे २०२५ रोजी भेट घेतली. त्यांना दिलासा देत, असे हल्ले सहन करून घेतले जाणार नाही असे संबंधित हल्लेखोरांना थेट इशारा दिला आहे.
"आम्ही येथे एक हिंदू म्हणून आलो आहोत"
१८ मे रोजी दहिसर पश्चिमेतील दोन कुटुंबांमधील भांडणात तीन जणांची हत्या झाली होती. ज्यामध्ये गुप्ता आणि शेख कुटुंब एकमेकांवर हिंसक पद्धतीने तुटून पडले होते. या हिंसक संघर्षात हल्ला झालेल्या गुप्ता कुटुंबाची नितेश राणे यांनी भेट घेतली. "मी पीडित कुटुंबाला भेटायला आलो आहे. माझी बहीण माझ्यासोबत आहे, आमचे आमदारही आमच्यासोबत होते. आज आम्ही सर्व हिंदू म्हणून एकत्र आलो आहोत, मंत्री किंवा आमदार म्हणून नाही - आम्ही येथे एक हिंदू म्हणून आलो आहोत," असे राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
राणे पुढे म्हणाले, "आम्ही आमच्या मुंबईत याप्रकारचे हल्ले होऊ देणार नाही. , हे त्यांच्या अब्बाचे लाहोर किंवा पाकिस्तान नाहीय. ही आमच्या हिंदुराष्ट्राची मुंबई आहे." नितेश राणे यांनी दहिसर येथे वाढत चाललेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्या लोकांच्या संख्येवरही आगपाखड केली आहे.
View this post on Instagram
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी ४.३० वाजता अरमान शेख दारूच्या नशेत गणपत पाटील नगर स्ट्रीटवरील राम नवल गुप्ता यांच्या नारळाच्या दुकानात आल्यावर हाणामारी सुरू झाली. अरमान आणि गुप्ता यांच्यात वाद सुरू झाला आणि नंतर दोघांनीही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना फोन केला. त्यानंतर गुप्ताचे मुलगे अमर गुप्ता, अरविंद गुप्ता आणि अमित गुप्ता हे घटनास्थळी धावले आणि हमीद नसिरुद्दीन शेख आणि हसन हमीद शेख अरमानला मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. दोन्ही कुटुंबांमधील जोरदार वादाचे रूपांतर लवकरच हिंसक झाले. या लोकांनी चाकू आणि कोयता यांसारख्या धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले. या हाणामारीदरम्यान, राम गुप्ता (५०), अरविंद गुप्ता (२३) हे बापलेक आणि हमीद शेख (४९) गंभीर जखमी झाले. त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
एमएचबी पोलिसांनी या घटनेसंबंधीत क्रॉस मर्डरचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत आणि फॉरेन्सिक पथकांनी गुन्ह्याच्या ठिकाणाहून नमुने गोळा केले आहेत. सध्या पोलिसांकडून साक्षीदारांची ओळख पटवण्याचे आणि त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.