
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधील इयत्ता १ली ते १०वीपर्यंच्या विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके मिळावीत यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. शिक्षण विभागाने मागणी केलेल्या पुस्तकांपैकी जवळपास ९६ टक्के पुस्तकांचा पुरवठा बालभारतीकडून मुंबई महानगरपालिकेला करण्यात आला आहे. ही सर्व पुस्तके २७ मेपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या सर्व १२ 'शहर साधन केंद्रा' पर्यंत पोहचवण्यात आली.
९वी व १०वीची पुस्तके १ जूनपासून शाळांमध्ये पोहचविण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताच पुस्तके मिळणार आहे. पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात येतात. ही पुस्तके बालभारतीकडून मागविण्यात येतात. पालिकेच्या शिक्षण विभागाने इयत्ता १ली ते ८वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी २० लाख ८२ हजार ६६१ पुस्तके, तर इयत्ता ९वी, १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ५ लाख २० हजार ५५२ पुस्तकांची मागणी बालभारतीकडे केली.
महानगरपालिकेने मागणी केलेल्या पुस्तकांपैकी १ लाख १५ हजार १४८ पुस्तके पुढील टप्प्यात येणार आहे. यामध्ये इयत्ता १ली ते ८वी पर्यंतची १ लाख ९ हजार ११५ पुस्तके असून, इयत्ता ९वी व १०वीची ६ हजार ३३ पुस्तके आहेत. या पुस्तकांचा बालभारतीकडून पुरवठा करण्यात येणार आहे. ही पुस्तके येताच ती 'शहर साधन केंद्रां' पर्यंत पोहचविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.