
डंपिंग ग्राऊंडवर पाणी साचून झाली दलदल
डंपर चालकांनी गाळ वाहून नेण्यास दिला नकार?
मुंबई : मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबले जावू नये याकरता नाल्यांसह मिठी नदीचे काम हाती घेण्यात आले असले तरी मागील आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे मिठीचा गाळ आधीच वाहून गेला आहे. त्यातच आता हा गाळ टाकण्यात येणाऱ्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये पाणी जमा होवून चिखल झाल्याने डंपर जातमध्ये जात नाही. परिणामी मिठी नदीचा गाळ वाहून नेणारी यंत्रणा असली तरी डम्पिंग ग्राऊंडमध्ये गाड्या जात नसल्याने या नदीतील काढून सुकवलेला गाळ वाहून नेण्याची प्रक्रिया बंद पडल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने मिठी नदीच्या सफाईसाठी तीन भागांमध्ये विभागून कंत्राद देण्यात आले आहे. या तिन भागांमध्ये कंत्राटदारांची निवड केल्यानंतर गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मिठी नदीतील गाळ बाजुला काढून ठेवल्यानंतर तो पूर्णपणे सुकल्यानंतर हा गाळ महापालिकेच्या एआय सॉफ्टवेअरवर सर्व प्रकारची नोंदणी प्रक्रिया केल्यानंतर डंपरद्वारे महापे येथील एका गावात निश्चित केलेल्या डम्पिंग ग्राऊंडवर खाली केला जात आहे. मागील आठवड्यापासून मुंबईसह राज्यात पावसाची संततधार सुरु असून महापे येथील या डम्पिंग ग्राऊंड परिसरात पाणी जमा होवून जाण्याच्या मार्गावर दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे गाळ वाहून नेणारे डंपर चालक आतध्यम वाहन नेण्यास नकार देत असून काही वाहने आतमध्ये गेल्यानंतर अडकल्यानंतर तुर्तास तरी कोणत्याही प्रकारची गाळाची वाहतूक करण्यास डंपर चालक तयार नसल्याने मिठी नदीचा काढून ठेवलेला गाळही उचलला जात नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४८ तासांमध्ये गाळ उचलला जावा अशाप्रकारचे निर्देश दिले असले तरी प्रत्यक्षात डम्पिंग ग्राऊंडवर पाणी तसेच चिखलसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने गाळ उचलून वाहून नेण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद असल्याची माहिती मिळत आहे.
डंपर चालक-मालक तयार नाही
तत्पूर्वी एआय सॉफ्टवेअरमुळे डंपरमध्ये गाळ भरण्यास होणारा वेळ लक्षात घेता अनेक डंपर चालकांनी तसेच मालकांनी नाल्यातील गाळ वाहून नेण्याऐवजी अन्य प्रकारची वाहतूक करण्याचा मार्ग स्वीकारला होता. त्यामुळे काही कंत्राटदारांनी शक्कल लढवून प्रत्येक डंपर चालकाला पहिल्या फेरीनंतर प्रत्येक फेरीला पाचशे रुपयांच्या पटीत बक्षीस जाहीर केल्याने या बक्षिसापोटी डंपर चालक काही तास थांबून गाळ वाहून नेण्यास तयार झाले होते. परंतु आता डंपिंग ग्राऊंडवर पाणी तुंबल्याने आतमध्ये डंपर टाकण्यास कोणताही चालक तथा मालक तयार नसल्याने गाळाची वाहतूक थांबल्याचे बोलले जात आहे.
गाळाची विल्हेवाट लावणे मोठी समस्या
मिठी नदीसाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांच्या सुपरवायझरसह महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाचे उपप्रमुख अभियंता आणि कार्यकारी अभियंता आदींनी या डम्पिंग ग्राऊंडची प्रत्यक्ष जावून पाहणी केली. त्यामध्ये मिठी नदीचा गाळ का उचलला जात नाही याची कारणे समजून घेतली. त्यामुळे पावसाने मुंबईमध्ये उघडीप घेतल्यानंतर मिठीचा गाळ काढून तो सुकवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी प्रत्यक्षात महापे परिसरात पाऊस पडत रहिल्यास आणि तो परिसर कोरडा न झाल्यास गाळाची विल्हेवाट लावणे मोठी समस्या असल्याचे बोलले जात आहे.