Thursday, May 29, 2025

क्रीडा

इंटरकॉन्टिनेंटल स्पर्धेत इंडियन वॉरियर्सची शानदार सुरुवात

इंटरकॉन्टिनेंटल स्पर्धेत इंडियन वॉरियर्सची शानदार सुरुवात

आफ्रिकन लायन्सचा ७ गडी राखून पराभव


नवी दिल्ली: शहीद विजय सिंग पथिक क्रीडा संकुलात इंटरकॉन्टिनेंटल लेजेंड्स चॅम्पियनशिपचा पहिला सामना अतिशय रोमांचक पद्धतीने सुरू झाला. मंगळवारी रात्री झालेल्या या सलामीच्या सामन्यात शिखर धवनच्या इंडियन वॉरियर्सने आफ्रिकन लायन्सचा ७ गडी राखून पराभव करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली.


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर आफ्रिकन लायन्सने २० षटकांत ५ गडी गमावून १९५ धावा केल्या. संघासाठी शेखर सिरोहीने फक्त २६ चेंडूंत ६५ धावांची स्फोटक खेळी केली. त्याच्या या खेळीत अनेक आकर्षक फटके पाहायला मिळाले. शेवटच्या षटकांमध्ये, शिवम शर्माने १४ चेंडूंत २४ धावा जोडून धावसंख्या मजबूत केली.


१९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंडियन वॉरियर्सची सुरुवात देखील वादळी झाली. शिखर धवन आणि प्रियांक पांचाळ यांनी पहिल्या सहा षटकात ६७ धावा जोडल्या. सातव्या षटकात संघाने दोन विकेट गमावल्या, तरीही पवन नेगी आणि केदार देवधर यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. केदार देवधरने ३९ चेंडूंत ६० धावा आणि पवन नेगीने २८ चेंडूंत ५७ धावा करून वॉरियर्सला विजय मिळवून दिला.


कर्णधार पांचाळनेही १७ चेंडूंत जलद ३८ धावा केल्या. या तिघांच्या आक्रमक फलंदाजीमुळे संघाने १५ चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकला. दरम्यान, सामन्यानंतर कर्णधार प्रियांक पांचाळ म्हणाला की, पहिला विजय खूप खास आहे. शिखर धवनसारख्या अनुभवी खेळाडूसोबत खेळणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. त्याने संपूर्ण डावात सातत्यपूर्ण मार्गदर्शन केले. त्यामुळे आम्हाला लक्ष्य सहज गाठता आले.

Comments
Add Comment