Thursday, May 29, 2025

महामुंबई

‘शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत करा’

‘शेतकऱ्यांना हेक्टरी  ५० हजारांची मदत करा’
मुंबई : राज्यातील शेतकरी संकटाचा सामना करत असताना मुसळधार पावसाने पुन्हा त्याला संकटात टाकले आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यभर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून राज्य सरकारने पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली.



बळीराजा संकटात आल्यास त्याला तातडीने मदत करण्याचे काम काँग्रेसचे सरकार असताना अनेकदा केले गेले. पिकावर रोग पडला, लाल्या पडल्या, गारपीट झाली, अवकाळी पावसाने नुकसान झाले की तत्कालीन काँग्रेस सरकारने शेतकऱ्याला मदत दिली आहे. केवळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन, कोरडी आश्वासने देऊन चालणार नाही तर शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहचवली पाहिजे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोठे संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जमाफी अद्याप जाहीर केलेली नसल्याने सरकारने कर्जाचे पुनर्गठन तरी करून द्यावे. याशिवाय अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मोफत बियाणे आणि खते द्यावीत, अशी मागणीही सपकाळ यांनी केली.
Comments
Add Comment