Thursday, May 29, 2025

ताज्या घडामोडीनवी मुंबई

नवी मुंबईत ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाटांसह जोरदार पाऊस

नवी मुंबईत ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाटांसह जोरदार पाऊस

आमदार मंदा म्हात्रे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट


नवी मुंबई : नवी मुंबईत ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाटासह रात्रीपासून कोसळलेल्या अतिवृष्टीचा आढावा घेण्याकरीता आमदार मंदा म्हात्रे यांनी भारतीय जनता पार्टीचे शिष्टमंडळ व सीबीडी येथील व्यापारासंह नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेतली.


यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबईमधील बेलापूर विभागातील सेक्टर १२ येथे असलेले सिडको निर्मित पावसाळी जलउदंचन केंद्र (पंप हाऊस) हे गेले ३५ ते ४० वर्षे जुने असून त्याचे भूमिपूजन होऊन देखील वर्षे झाली आहेत, परंतु अद्यापपर्यंत काम पूर्ण न झाल्याने अतिवृष्टीमुळे नवी मुंबईत व विषेशत: सीबीडी बेलापूर विभागात सखल भागात असलेल्या सेक्टर ४,५,११ येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तीन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या मनात काही अंशी भीतीचं वातावरण पसरलं होतं. याच पूरसदृश्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळासहित नुकतेच महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदन दिले.



तसेच जेव्हा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्याचा फटका रहिवाशांना व वाहतुकीवरती मोठ्या प्रमाणात बसतो. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस जसा कोसळत आहे त्याचप्रमाणे आगामी मान्सूनमधील पावसाचा अंदाज पाहता मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करण्यासाठी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरवण्याचे नियोजन करण्याचे निर्देश आमदार मंदा म्हात्रे यांनी महापालिका आयुक्तांना दिले. त्याचप्रमाणे पूरनियंत्रण कक्ष, आपत्ती व्यवस्थापनाच्यावतीने नागरिकांच्या जीविताचे रक्षणाच्या अनुषंगाने वाशी येथील पावसाळी जलउदंचन केंद्राचे ही काम लवकरात लवकर करावे. तसेच नवी मुंबईमध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा या विषयावरही सकारात्मक चर्चा आमदार मंदा म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांसोबत केली.

Comments
Add Comment