पुणे : वैष्णवी मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुबीयांच्या पोलीस कोठडीत वाढ होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे तसेच सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे या पाच जणांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती. या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्यामुळे आज पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे. यावेळी चौकशीसाठी तसेच काही कायदेशीर प्रक्रियांसाठी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांकडून केली जाण्याची शक्यता आहे.
वैष्णवीला तिच्या सासरच्या मंडळींकडून सतत मानसिक त्रास दिला जात होता. तिला वेळोवेळी मारहाण करण्यात येत होती. कौटुंबिक कलह, हुंड्याची मागणी आणि आर्थिक कारणांमुळे हा छळ दिवसेंदिवस वाढत गेला. अखेर सहनशक्तीचा अंत होऊन वैष्णवीने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी मांडला आहे. या प्रकरणात अजूनही निलेश चव्हाण हा आरोपी फरार आहे. वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर हगवणे कुटुंबाने तिचे बाळ निलेशच्या ताब्यात दिले होते. बाळाची विचारपूस करण्यासाठी गेल्यावर निलेशने वैष्णवीच्या माहेरच्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला होता. यामुळे पोलीस निलेशला शोधत आहेत.
शवविच्छेदन अहवालानुसार अर्थात पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार वैष्णवीच्या शरीरावर २९ जखमा आढळल्या. यापैकी १५ जखमा या तिचा मृत्यू होण्याआधीच्या २४ तासांतील होत्या. वैष्णवीला वारंवार पाईप, गज आदी वापरुन बेदम मारहाण करण्यात आली होती.