
लखनऊ : आयपीएल २०२५ च्या शेवटच्या लीग सामन्यात शतक केल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत खूप आनंदी दिसत होता. त्याचा उत्साहही शिगेला पोहोचला होता, पण या सामन्याचा निकाल त्याच्या बाजूने लागला नाही. इतकेच नव्हे तर सामन्यानंतर त्याला दंडदेखील भरावा लागला. मंगळवारी(दि.२७) लखनौमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात संघाच्या स्लो ओव्हर रेटसाठी लखनौचा कर्णधार ऋषभ पंतला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
लखनऊचा हा या हंगामातील तिसरा गुन्हा ठरला. ५ एप्रिल आणि २६ एप्रिल या दोन सामन्यांमध्येही पंतला षटकांची गती कमी राखल्याने दंड भरावा लागला होता. ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, पंतला तिसऱ्या चुकीसाठी ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, इम्पॅक्ट खेळाडूसह उर्वरित प्लेइंग इलेव्हन खेळाडूंना वैयक्तिकरित्या १२ लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या ५० टक्के (जे कमी असेल ते) दंड ठोठावण्यात आला आहे.
ऋषभ पंतचा हा तिसरा गुन्हा होता. पण असे असूनही त्याला निलंबित केले जाणार नाही. आयपीएल २०२४ पर्यंत तिसऱ्या दंडानंतर एक सामन्याच्या बंदीचा नियम होता. आयपीएल 2025 मध्ये नियमात सुधारणा करण्यात आली. पण गेल्या वर्षीच्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याच्यावर बंदीची कारवाई झाली होती. त्यामुळे ती शिक्षा दिली गेली. त्यानंतर नियमातील बदल लागू केले गेले.