Tuesday, May 27, 2025

विशेष लेख

मुंबईची तुंबई थांबणार कधी?

मुंबईची तुंबई थांबणार कधी?

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर


मुंबईला पावसाने २६ मेच्या पहाटेपासून अक्षरश: झोडपून काढले. मुंबई शहर आणि उपनगरात दोनशे मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. मुंबईचे जनजीवन ठप्प झाले. मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बर आणि मेट्रो रेल्वे सेवाही काही काळ बंद पडली. सर्वात कहर म्हणजे बीकेसी ते वरळी आचार्य अत्रे चौक या मार्गावरील भुयारी मेट्रो ३ चे उद्घाटन पंधरा दिवसांपूर्वीच झाले होते. पावसाचे पाणी घुसले आणि मेट्रो स्टेशनला तलावाचे स्वरूप आले. मान्सूनचा पहिल्या सलामीत धो धो पाऊस, लोकल बंद, बेस्ट विस्कळीत, रस्ते, रेल्वे मार्ग पाण्याखाली, सर्वत्र पाणीच पाणी, चिखलाचे साम्राज्य. अगदी जेजे आणि केईएम इस्पितळातही पाणी घुसले. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच गुडघाभर पाणी. हिंदमातापासून अंधेरी-मिलन सब वे, शीवचे गांधी मार्केट पाण्याखाली. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशीच देशाची आर्थिक राजधानी मुंबईची तुंबई झाली. लाखो कर्मचारी, चाकरमानी आपल्या कामावर जाऊ शकले नाहीत.


ठिकठिकाणी पाणीच पाणी साचल्याने लाखो मोटारी सोमवारी रस्त्यावर आल्या नाहीत. दोन कोटी लोकसंख्येच्या महामुंबईचे जनजीवन ठप्प झाले. एका दिवसात शेकडो कोटींचे नुकसान झाले. मान्सूनच्या पहिल्या सलामीने देशाची आर्थिक राजधानी ठप्प झाली. मुंबईला सेवा-सुविधा देणाऱ्या डझनभर सरकारी, निमसरकारी यंत्रणा अपयशी ठरल्या. यंदाच्या पावसाळ्यात मुंबई तुंबणार नाही, लोकल सेवा बंद पडणार नाही, असे दावे नेहमी केले जातात, पण एका पावसाने ते फोल ठरवले. नालेसफाई शंभर टक्के न झाल्याचे पावसामुळे उघडकीस आले. मान्सूनचा पाऊस सोळा दिवस अगोदर आला किंवा दोनशे मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला किंवा गेल्या १०७ वर्षांत मे महिन्यात मुंबईत रेकॉर्डब्रेक पाऊस झाला अशी कारणे देऊन मुंबईचे जनजीवन ठप्प करण्याचे खापर पावसावर फोडले जात आहे. मुंबईकर जनतेने ते कितपत मान्य करावे?


धुवांधार पावसाने मुंबईची तुंबई झाली आणि मुंबई ठप्प झाली हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईचे जनजीवन दोन-तीनदा तरी विस्कळीत होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही पावसाळ्यात मुंबईची तुंबई झाली होती. मुंबई ही देशाचे अत्यंत महत्त्वाचे महानगर आहे. मग दरवर्षी मुंबईवर पावसाळ्यात जनजीवन विस्कळीत होण्याची आफत यावी? मुंबई महानगराला मुंबई महापालिका नागरी सेवा-सुविधा पुरवते. पंचवीस वर्षांहून अधिक काळ मुंबई महापालिकेवर ठाकरे यांच्या उबाठा सेनेची (पूर्वीच्या शिवसेनेची) सत्ता होती. पंचवीस वर्षे सलग सत्ता असूनही ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई जलमयमुक्त किंवा अतिक्रमणमुक्त का करता आली नाही? पंचवीस वर्षांच्या कालावधीत मुंबईवर आदळणारे परप्रांतीयांचे लोंढे ठाकरे यांच्या पक्षाला नियंत्रणात का ठेवता आले नाहीत? पंचवीस वर्षांत महापालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त का करता आला नाही. पंचवीस वर्षांत किती अमराठी ठेकेदारांना महापालिकेची रस्त्याची, पुलांची, खड्डे बुजवायची, उड्डाणपुलांची, स्वच्छता व मलनिस्सारणाची कामे दिली गेली? ठाकरे यांच्या पक्षाच्या कारभाराचा मुंबईची तुंबई होण्याशी किती संबंध आहे हे सुद्धा लोकांना समजले पाहिजे.


जपानला मागे टाकून भारताने जगातील चौथी अर्थव्यवस्था असा सन्मान प्राप्त केला आहे. त्यात मुंबईचे आर्थिक योगदान सर्वात मोठे आहे. केंद्र सरकारच्या दरमहा जमा होणाऱ्या जीएसटीमध्ये सर्वाधिक वाटा हा मुंबईचा आहे. केंद्र सरकारच्या एकूण महसुलात मुंबईचा वाटा सुद्धा सर्वाधिक आहे. कितीही उद्योग व प्रकल्प दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत झाले तरी मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही. पण मुंबई ही केवळ सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे किंवा सरकारी खजिना भरणारे समृद्ध शहर आहे, अशी मानसिकता कोणाचीही असता कामा नये. देशातील सर्व राज्यातील व केंद्रीय नेत्यांची घरे मुंबईत आहेत. बॉलिवूड ही तर मुंबईची शान आहे. मोठमोठ्या कंपन्या व बडे उद्योग समूह यांची नोंदणीकृत कार्यालये मुंबईतच आहेत. उत्तुंग पदांवर पोहोचलेले राजकीय नेते, मोठे उद्योगपती, अर्थशास्त्रज्ञ, साहित्यिक, कवी, विकासक, वास्तुशास्त्रज्ञ, शिल्पकार, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, कलाकार, खेळाडू, संगीतकार, नाटककार, अशी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मांदियाळी हे मुंबईचे वैभव आहे. दिल्लीच्या तोडीस तोड प्रवाशांची वाहतूक करणारा आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईत आहे.


देशातील सर्व शहरांना जोडणारी विमान व रेल्वेसेवा आणि बंदर अशा सुविधा मुंबईतच आहेत. मुंबईत बँका, विमा कंपन्या, दूतावास, खासगी कंपन्यांची मुख्यालये व वाणिज्य कार्यालये मुंबईतच आहेत. मुंबईचे ऐतिहासिक, भौगोलिक आणि व्यापारी महत्त्व देशातील अन्य कोणत्याही शहरापेक्षा खूपच मोठे आहे. दीड कोटी लोकसंख्येची मुंबई आणि ठाणे, नवी मुंबईसह दोन कोटी लोकसंख्येची महामुंबई अहोरात्र धावत असते. मुंबईसारखे वर्किंग कल्चर देशात कुठेही नाही. मुंबईत खिशात पन्नास – शंभर रुपयांतही सामान्य माणूस पोटभर जेवण करू शकतो आणि श्रीमंतांसाठी त्रितारांकित व पंचतारांकित उंची सेवा देणारी हॉटेल्सही भरपूर आहेत. मुंबईत जशी मीटरवर धावणारी रिक्षा- टॅक्सी अहोरात्र उपलब्ध आहे, तसेस सामान्यांना आरोग्यसेवा देणारी महापालिकेची व सरकारी इस्पितळे उपलब्ध आहेत. तसेच देशातील सर्वोत्तम खासगी इस्पितळे मुंबईतच आहेत.


उत्तम शिक्षणसंस्थाही याच महानगरात आहेत. हिंदी प्रदेशात विकास प्रकल्पांच्या नावाखाली हजारो कोटींची गुंतवणूक केली तरी यूपी, बिहार, हरियाणा, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालकडून रोजगाराच्या शोधात येणारे सर्वाधिक लोंढे मुंबईकडे येतच असतात. देशाचा आर्थिक आधारस्तंभ असलेली मुंबई एका मुसळधार पावसाने ठप्प होते, हे दुर्दैव आहे. मुंबईची दरवर्षी होणारी तुंबई कधी थांबणार हाच लाखमोलाचा प्रश्न आहे.


मुंबई हे तीन बेटांचे मिळून बनलेले शहर आहे. मुंबईच्या बेटावर किती लोकसंख्या राहू शकते, किती टोलेजंग इमारती उभ्या राहू शकतात, किती लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्याची क्षमता आहे, लोकल किंवा बस वाहतूक किती प्रवाशांना सेवा देऊ शकते, किती झोपडपट्ट्या या शहराने सांभाळायच्या, यावर राज्यकर्त्यांनी व लोकप्रतिनिधींनी मंथन केले आहे का? विधिमंडळात पूर्वी मुंबईच्या प्रश्नांवर सखोल चर्चा व्हायची. मुंबईत एक कोटींपेक्षा जास्त लोक अमराठी आहेत. परप्रांतातून येणाऱ्या अनोळखी लोकांची पार्श्वभूमी काय आहे, याची माहिती तरी पोलिसांकडे आहे का? मुंबई ही सार्वजनिक धर्मशाळा झाली आहे का? मुंबईत कष्ट करून पोट भरणारी जनता लाखोंच्या संख्येने आहे, मुंबईत येऊन अनेक गडगंज झालेत. मुंबईत येऊन आपण मोठे व्हावे असे स्वप्न बाळगून लोक इथे येत असतात. मग मान्सूनच्या पहिल्या पावसाने लक्षावधी मुंबईकरांना घरी बसावे लागले, ही मालिका कधी थांबणार आहे?


मुंबईचा आकार बशीसारखा आहे, जोरदार पाऊस सुरू असताना समुद्राला भरती आली की पाणी वाहून जात नाही व रस्त्यावर पाणी साचते असेही कारण वर्षानुवर्षे सांगितले जाते. मग त्यातून मुंबईची सुटका कधीच होणार नाही का?


मुंबईच्या लोकल्समधून रोज ७५ लाखांहून अधिक प्रवास करतात. मुंबईच्या बेस्टमधून आजही तीस लाख प्रवास करतात. १९९०-९५ पर्यंत अनेक आमदार- नगरसेवक हे लोकलने सीएसटी किंवा चर्चगेटला यायचे, स्टेशनबाहेर बेस्टच्या बस थांब्यावर उभे असलेले दिसायचे. भाजपाचे राम नाईक हे केंद्रात मंत्री झाले, राज्यपालही झाले, पण ते आमदार असताना लोकलने चर्चगेटला यायचे. अशी आणखी काही नावे सांगता येतील. राम नाईक, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, प्रेमकुमार शर्मा, हशू अडवाणी, राम कापसे, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर अनेक लोकप्रतिनिधी मुंबईच्या प्रश्नांवर विधिमंडळात पोटतिडकीने बोलत असत. आता तसे चित्र दिसत नाही. महापालिका, मुंबई महानगर विकास प्राधिकरण, मेट्रो रेल्वे, मध्य किंवा पश्चिम रेल्वे, बेस्ट, म्हाडा, सार्वजनिक बांधकाम, एसआरए आदी यंत्रणा मुंबईसाठी राबत आहेत. अतिवृष्टीतही रेल्वे आणि बेस्ट मुंबईकरांना सेवा देते त्याला तोड नाही.


लक्षावधी मुंबईकरांचे दैनंदिन जीवन सार्वजनिक सेवेवरच अवंलबून आहे याची जाणीव रेल्वे आणि बेस्टला आहे. लोकांनीही रस्त्यावर कचरा टाकणार नाही, पान, तंबाखू थुंकणार नाही, रुळांवर चूळ थुंकणार नाही, कागदाचे बोळे, प्लास्टिकच्या पिशव्या कुठेही फेकणार नाही असा निर्धार करायला नको का? मुंबई स्वच्छ राहिली तर तुंबई होणार नाही, नालेसफाई चांगली झाली तर रस्त्यावर व रुळावर पाणी साचणार नाही. कचराकुंड्यांची साफसफाई झाली तर गटाराचे पाणी अस्ताव्यस्त पसरणार नाही. भारत देश जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मुंबईची तुंबई होणे आवडणार नाही...


[email protected]
[email protected]

Comments
Add Comment