
वणी: गेल्या दोन महिन्यांपासून विजेच्या पुरवठ्याबाबत नियमित तक्रारी व त्यामुुुळे सर्वसामान्य ग्राहकांबरोबरच पाणीपुरवठाही होत नसल्याने ग्रामपालिकाही त्रस्त झालेली. अशा परिस्थितीत सरपंच मधुकर भरसट यांनी महावितरण कंपनीचे दिंडोरी उप कार्यकारी अभियंता एस. के. राऊत यांना बोलवत ग्रामस्थांसह समस्यांचा पाढा वाचून महावितरणच्या अधिका-यांना धारेवर धरले.
यावेळी उपसरपंच विलास कड यांनी वीज बिल भरण्याची अंतिम मुदत बाकी असतानाही वीज बिल भरले नाही म्हणून वणीला पाणीपुरवठा करणारी लाईन का तोडली याबाबत जाब विचारला. ट्रान्सफार्मर पाऊस आला की लगेच ब्रेकडाऊन होतो. तसेच अंबानेर, पांडाणे, फोपशी, नांदुरी, चंडीकापुर या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असुन सदर परिसरातील फिडरची लाईट रात्रीच्या वेळी बंद करु नये अशी मागणी काहींनी केली. सरकारी दवाखान्यातील ट्रान्सफाॅर्मरवरून दवाखान्यात होणारा पुरवठाही सुरळीत नाही. गावातील वीज पुरवठा करणारे खांब व त्यावरील लाईन ५० वर्षांपेक्षा अधिक जुनी झाली आहे.
तसेच काही ठिकाणी खांबही जीर्ण झालेले आहेत. तर काही ठिकाणी झुकलेले आहेत. खांबावरील वायरी काही ठिकाणी लोंबकळत असुन त्यांना ताण देऊन त्या ओढून घ्याव्यात अशा अनेक समस्यावजा सूचना करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी उपस्थित ग्रामस्थ व ग्रा. पं. सदस्य यांच्या मार्फत काही सूचना करण्यात आल्या. यावेळी राऊत यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची कानउघडणी करत त्यांना तंबी दिली. तसेच पुढील आठ, दहा दिवसांत प्रलंबित कामे जातीने लक्ष घालून पूर्ण करून देतो असे उपस्थित ग्रामस्थांना आश्वासित केले. दिलेल्या मुदतीत प्रलंबित कामे पूर्ण करून वीज पुरवठा नियमित न केल्यास ग्रामस्थांतर्फे आंदोलन छेडले जाईल, अशी तंबी व्यापारी बँकेचे अध्यक्ष महेद्र बोरा यांनी दिली. यावेळी सहा. अभियंता महेश पवार, महेंद्र मुळकर, पी. बी. शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पारख, विजय बर्डे, जगन वाघ, मीनाताई पठाण, कैलास धुम, अनिल गांगुर्डे, नामदेव पैठणे, संतोष रेहेरे, किशोर बोरा आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.