Tuesday, May 27, 2025

ठाणे

ठाणे कारागृहातील बंदी बनणार कुशल फोटोग्राफर

ठाणे कारागृहातील बंदी बनणार कुशल फोटोग्राफर

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा अभिनव उपक्रम


ठाणे :समाजाने फेटाळलेले, गुन्हेगारीच्या चक्रात सापडलेले आणि आपल्या चुकीच्या निर्णयामुळे जीवनात मागे पडलेले अनेक बंदी ठाणे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. मात्र, या बंदींना त्यांच्या आयुष्यात नव्याने सुरुवात करण्याची, एक नवी दिशा मिळवण्याची संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि ठाणे मध्यवर्ती कारागृहानें दिली आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात डिजिटल फोटोग्राफी आणि व्हीडिओ हा विशेष अभ्यासक्रम प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे. या अभिनव उपक्रमातून कारागृहातच बंदींना छायाचित्रणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणात बंदींनी जबरदस्त उत्साहाने सहभाग नोंदवला आहे.



या उपक्रमामध्ये ठाण्याचे ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार प्रफुल्ल गांगुर्डे यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. ते म्हणजे त्यांनी आपले सामाजिक भान राखत बंदींना प्रशिक्षण दिले आहे. आपल्या अनुभवाचा खजिना खुला करत या बंदींना छायाचित्रणाची मूलभूत तत्त्वे, कॅमेरा हाताळणी, फ्रेमिंग, प्रकाशाचा वापर, स्टोरीटेलिंग आणि फोटो जर्नलिझम यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या आहेत. प्रशिक्षणाचे वर्ग आठवड्यातून दोन वेळा घेतले जात आहेत. सध्या या बंदींची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असून येत्या जून महिन्यात अंतिम लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर उत्तीर्ण झालेल्या बंदींना विद्यापीठाचं अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या संपूर्ण उपक्रमामध्ये जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि ठाणे कारागृह यांचा संयुक्त सहभाग आहे.


फोटोग्राफीचे हे प्रशिक्षण म्हणजे केवळ कॅमेराशी ओळख नव्हे, तर एक नवीन संधीची पहाट आहे. जेव्हा हे बंदी शिक्षण पूर्ण करून कारागृहाबाहेर पडतील, तेव्हा त्यांच्या हातात कौशल्य असेल-ज्याच्या आधारे ते रोजगार मिळवू शकतील, स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील किंवा किमान नवा मार्ग शोधू शकतील. आपण समाजाचे काही देणे लागतो. या भावनेतून बंदीवानांना प्रशिक्षण द्यावेसे वाटले आणि ही संधी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठने दिली. सुरुवातीला ही लोकं गुन्हेगार वाटायचे, पण हळूहळू त्यांच्यातील माणूस माझ्या समोर उभा राहिला. आता ते मनापासून शिकत आहेत, असे मत छायाचित्रकार प्रफुल्ल गांगुर्डे यांनी मांडले आहे.

Comments
Add Comment