
इगतपुरी : नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात मंगळवार दि. २७ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दरड कोसळली. रात्रभर झालेल्या तुरळक पावसाने ही दरड कोसळली असून दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पोलीस केंद्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत हाताने ढकलत पडलेली ही दरड बाजुला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात झाली.
संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घालत हाहाकार माजवला आहे. मात्र इगतपुरी तालुक्यात अजुन जोरदार पावसाने हजेरी लावली नाही. इगतपुरीत अद्याप तुरळक पाऊसच कोसळत आहे. अशा या तुरळक पडणाऱ्या पावसानेच जर दरड कोसळत असेल तर, सलग चार मुसळधार महिने पाऊस सुरू झाल्यावर कसारा घाटात काय परिस्थिती निर्माण होईल असा प्रश्न वाहनचालक व प्रवाशांना पडला आहे.