Tuesday, May 27, 2025

ताज्या घडामोडीनवी मुंबई

सिडको आपत्कालीन नियंत्रण कक्षात तक्रारी नोंदवू शकणार

सिडको आपत्कालीन नियंत्रण कक्षात तक्रारी नोंदवू शकणार

मुंबई  :सिडको महामंडळाचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष सोमवारपासून ३० सप्टेंबर २०२५ या पावसाळी कालावधीमध्ये २४/७ तत्त्वावर कार्यान्वित करण्यात आला आहे. दरवर्षी पावसाळी कालावधीमध्ये सिडकोतर्फे नवी मुंबईतील सिडको अधिकार क्षेत्रातील नागरिकांकरिता आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येतो. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्ती लक्षात घेता सिडकोचा सुसज्ज असा आपत्कालीन नियंत्रण कक्ष
कार्यरत असतो.


२६ मे २०२५ रोजी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी, सुरेश मेंगडे यांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या तयारीचा व या कक्षाच्या माध्यमातून पार पाडल्या जाणाऱ्या सर्व सेवा व सुविधांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे सर्व संबंधित नोडल अधिकाऱ्यांना नागरिकांच्या मॉन्सून संबंधित तक्रारीचे वेगाने निराकरण करण्याचे आदेश दिले. सीबीडी बेलापूर येथील सिडको भवन इमारतीच्या तळ मजल्यावर असलेला हा नियंत्रण कक्ष कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांसहित शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही २४ तास कार्यरत राहणार असुन या कक्षामार्फत अभियांत्रिकी विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग, उद्यान विभाग आदी महत्त्वाच्या विभागाचे कर्मचारी संपर्कात असतील.



सिडकोच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाद्वारे वृक्षांची पडझड वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी, रस्त्यावरील उघड्या गटारांची झाकणे पूर्ववत बसवणे, पूर/पूरसदृश परिस्थिती, रस्त्यांवरील खड्डे, रस्ते वा नाल्याजवळ साचलेला कचरा, व्यक्तीचे पाणीसाठ्याच्या ठिकाणी बुडणे, आग व आगीचे विविध प्रकार, साथीचे रोग, विषारी प्राणी चावण्यासंबंधी बाबी, इमारत कोसळणे, भूस्खलन, पाणी साचणे या आपत्तींची दखल घेण्यात येऊन त्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांनी वरीलपैकी कोणतीही आपत्ती उद्भवल्यास पुढे देण्यात आलेल्या दुरध्वनी अथवा व्हॉटसअॅप क्रमांकावर किंवा ई-मेलद्वारे सिडको आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून आपत्तीसंबंधी माहिती द्यावी किंवा त्याबाबतची तक्रार नोंदवावी.

Comments
Add Comment