
खासदार नारायण राणे यांचा विरोधकांवर जोरदार प्रहार!
मुंबई: भाजप खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर, खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य राज उद्धव युतीवर देखील त्यांनी जोरदार 'प्रहार' केला.
सोमवारी दिनांक 26 मे रोजी पहिल्याच पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले. ज्याचा परिणाम मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीवर झाला. काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेल्या भुयारी मेट्रो स्थानकामध्ये पावसाचे पाणी गेल्याप्रकरणी उबाठा गटातील शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाजप आणि महायुती सरकारवर थेट निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत, विरोधकांवर थेट हल्लाबोल चढवला. ज्यात आदित्य ठाकरेने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर चांगलेच तोंडसुख घेतले.
आदित्य ठाकरेंना थेट इशारा
आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून भाजपला लक्ष्य केलं आहे. नगरसेवकांना फोडण्यासाठी वापरला जाणारा पैसा हा मुंबईकरांचे आज जे हाल झाले त्यातून काढलेला असल्याचा आरोप आदित्य यांनी त्यात केला. तसेच, केंद्रातील भाजप नेत्यांवरही आदित्य यांनी हल्लाबोल केला. त्यावरुन, नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंना थेट इशारा दिला आहे. आदित्य ठाकरे, तू मोदी, शाह, फडणवीस यांची नावं घेतलीस तर याद राख, अशा शब्दात नारायण राणेंनी ठाकरेंना चांगलाच दम भरला.
26 जुलै 2005 च्या अतिवृष्टीची आठवण करून देत केली बोलती बंद
मुंबईतील पावसाची आठवण सांगताना नारायणे राणेंनी 26 जुलै 2005 ची घटना सांगितली. "काल मुंबईत जो पाऊस पडला, विरोधकांमध्ये हाहाकार उडाला आहे. 26 मे रोजी 252 मिमी पाऊस मुंबईत पडला. पण, आदित्य, उद्धव ठाकरे यांना एक आठवण करून देतो. 26 जुलै 2005 ला 944 मिमी पाऊस मुंबईत पडला होता. त्यावेळी, 27 तारखेला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता, त्यांची राजवट असताना पडला, तरी मुंबई बुडाली नव्हती, असे नारायण राणे यांनी टोला लगावला.
"2005 साली महापालिकेत कुणाची सत्ता होती, मिठी नदी नव्हती का,आता आली का? तेव्हा साफ केली होती का? तरी पण पाणी का भरले? वस्त्यांमध्ये पाणी का गेले? किती वय होते तुझे, आठवण कर, काहीही बोलतो. कमाईचे साधन निर्माण करण्यासाठी काहीही बोलतो, असे सवाल नारायण राणेंनी उपस्थित केले आहेत. सन 1985 साली मी नगरसेवक झालो, मी बेस्ट चेअरमन झालो, तेव्हा पालिकेत काय चालले होते, तू नव्हता, मी होतो."
सन १९८५ च्या आधी यांचे काय उत्पन्न होते?
भ्रष्टाचार हा उद्धव व आदित्यच्या रक्तात भिनला आहे, सन १९८५ च्या आधी यांचे काय उत्पन्न होते? स्टेटमेंट काढा, उत्पन्नाचे साधन काय बाळासाहेबांच्या नावाने एक बावळट मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात झाला, त्याला फायनान्स माहिती नाही, रोजगार कळत नाही, असे म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
मुंबईत किती मराठी राहिले?
मराठीच्या मुद्द्यावरून बोलताना नारायण राणे यांनी आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला. आज लालबाग परळ मध्ये जे बिल्डिंग बांधले गेले, त्यात किती मराठी लोकं आहेत. याचे कंत्राट या ठाकरेंकडेच होते, त्यांनी काय केले? किती मराठी लोकांना जागा दिली? असा सवाल त्यांनी केला.
दिनो मोर्या आणि आदित्य संबंध
दिनो मोर्या कोण, आदित्य त्याच्याकडे का येतो, काय करतात, ही सगळी माहिती माझ्याकडे आहे. पण, मी शांत आहे. मोदी, शाह, फडणवीस यांची नावे घेऊ नका, अशा शब्दात नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंना इशारा दिला. तर, संजय राऊत तुम्हाला आत घेऊन जाईल, माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. मिठी नदीसाठी मशिन वापरली पाहिजे म्हणाले, केतन कदम हा लायजनर आहे. ही परवानगी कुणी दिली, दिसत नसलेले पाणी दाखवतो, यावर उत्तर दे असे राणेंनी म्हटले. तसेच, इलेक्ट्रिक घोडागाडी खरेदी केली, त्यात केतन कदम व दिनो मोर्याचा भाऊ पार्टनर आहेत, हे मराठी आहेत का, शिवसैनिक आहेत का? उद्धव ठाकरे यांनी किती शिवसैनिकांना कामे दिली? असे अनेक सवाल राणेंनी उपस्थित केले आहेत.
भाजपचा पूर आलाय. त्यात हे टिकणार नाहीत
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती होणार अशी चर्चा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होत आहे. मात्र ही दोघे एकत्र येऊनही त्यांना काहीच फायदा होणार नाही असा दावा राणे यांनी केला. "कुणाच्याही सोबत जा. पूर आल्यावर पुराच्या पाण्याबरोबर सर्व वाहून जातात. भाजपचा पूर आलाय. त्यात हे टिकणार नाहीत. आणि पूर हा जाचक नाहीये, लोकांना त्रास होणार नाही. उलट फायदाच होईल. सत्ता आमची दोन्हीकडे आहे. सर्व सामान्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकार चांगलं काम करत आहेत." असे ते म्हणाले. तसेच ही दोघं निवडणुकीत एकत्र येऊन काय सांगणार? २६ वर्षाच्या भ्रष्टाचारावर बोलणार की कोरोना काळातील भ्रष्टाचारावर बोलणार.” असा खडा सवाल त्यांनी केला.