विमानसेवा की विनोदसेवा? पेट्रोल नाही म्हणून विमान सेवा ठप्प, वाचा नेमकं काय झालं?

  59

विमान थांबवलं, प्रवाशांचा संताप अनावर!


अमरावती : ही काय विमानसेवा आहे की तमाशा? अमरावतीहून मुंबईला जाणाऱ्या विमानात ७४ प्रवासी बसले, बेल्ट लावले, विमान झेप घेण्याच्या प्रतिक्षेत होते आणि तेवढ्यात पायलट बाहेर येऊन सांगतो, "पेट्रोलच नाही. टँकर चिखलात अडकलाय!" पेट्रोल नसल्यानं विमान उडणार नाही? प्रवाशांना वाटलं कदाचित हा एखादा वाईट विनोद असावा, पण हीच होती कडवी वस्तुस्थिती!



अमरावतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोमवारी एक अभूतपूर्व आणि संतापजनक प्रसंग घडला. दुपारी चारच्या फ्लाइटसाठी ७४ प्रवासी विमानात बसून उड्डाणाची वाट पाहत होते. मात्र, पायलटने अचानक येऊन सांगितले की, पेट्रोलचा टँकर चिखलात अडकल्याने विमानात इंधन भरणे शक्य झालेले नाही आणि त्यामुळे हे विमान उडणारच नाही. या माहितीनंतर प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली.


टँकर चिखलात अडकल्याने विमान रद्द


या ७४ आसनी विमानातील सर्व प्रवासी सुरक्षेची आणि बोर्डिंगची सर्व प्रक्रिया पूर्ण करून बसलेले असतानाच, पायलटने माफी मागून विमान रद्द करण्याची घोषणा केली. या कारणावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. विमानसेवेतील गंभीर त्रुटीचे हे उदाहरण प्रवाशांसाठी धक्कादायक ठरले.



प्रवाशांचा तीव्र रोष


पेट्रोल उपलब्ध नाही म्हणून विमान रद्द करण्याच्या निर्णयामुळे प्रवासी अक्षरशः संतप्त झाले. "पेट्रोल नसताना विमानसेवा सुरू कशासाठी केली?", असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. मुंबईत महत्त्वाच्या कामांसाठी निघालेल्या प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. अमरावती शहराबाहेरून आलेल्या प्रवाशांना हॉटेलमध्ये मुक्काम करावा लागला, तर काही जण परत घरी गेले.


दुसऱ्या दिवशीही गोंधळ कायम


सोमवारी रद्द झालेली ही फ्लाइट मंगळवारी उड्डाण करेल, अशी माहिती प्रवाशांना देण्यात आली होती. त्यामुळे ते सकाळी सातपासूनच विमानतळावर पोहोचले. मात्र, दुपारी एक वाजेपर्यंत त्यांना स्पष्टता मिळाली नाही आणि पुन्हा सांगण्यात आले की "विमान आता दुपारी चारला उडेल." या सातत्यपूर्ण गोंधळामुळे प्रवासी अधिकच त्रस्त झाले.


विमानतळ प्रशासन गप्प


या संपूर्ण प्रकरणात पत्रकारांना विमानतळ परिसरात जाण्याची बंदी घालण्यात आली. अधिकृतरीत्या केवळ एवढीच माहिती देण्यात आली की, "पेट्रोलचा टँकर चिखलात अडकल्यामुळे विमानात इंधन भरता आलं नाही." मात्र, या सगळ्यावर कोणतीही स्पष्ट भूमिका घेण्यास प्रशासनातील कोणीही पुढे आलेलं नाही.


प्रवाशांची भावना – "काय करावं समजत नाही"


एका वृद्ध प्रवाशाने सांगितले, "रात्र नातेवाईकांकडे काढली, आज पुन्हा विमानतळावर आलो, पण आता म्हणतायत चार वाजता उड्डाण होईल. प्रवाशांना वेगवेगळ्या ठिकाणी थांबवले आहे. अनेक ठिकाणी वाद सुरू आहेत. आता खरंच काय करावं हेच समजत नाही."

Comments
Add Comment

'ग्लोबल गणेश फेस्टिवल २०२५'च्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

पुणे: गौरवशाली परंपरा असलेल्या पुण्याचा गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक करण्यासाठी ग्लोबल

कांदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नाशिक जिल्ह्यातील ९६७२ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १८ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरीत

येवला: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला लासलगाव

तुळजाभवानी मंदिरात तणाव: आव्हाड समर्थकांनी सुरक्षा रक्षकांशी धक्काबुक्की केल्याचा आरोप

तुळजापूर: तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामावरून सुरू असलेल्या वादामुळे तुळजापूरमध्ये राजकीय

ठाण्यात यंदा टेंभीनाक्यावर अनुभवयाला मिळणार थरांचा थरार

ठाणे :  धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन

मुंबई-दिघी आणि मुंबई-काशीद रो-रो सेवा मार्चपर्यंत कार्यान्वित करा- मंत्री नितेश राणे

डिझेल परतावा योजनेपासून एकही पात्र मच्छीमार वंचित राहणार नाही मुंबई : मुंबईकरांचा कोकणात जाण्याचा प्रवास सुखकर

Laxman Hake on Manoj Jarange Patil: गणेशोत्सवात मुंबईला जाऊन दंगल घडवायचा जरांगेंचा प्लॅन! लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

पुणे: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा मोर्चा घेऊन धडकणार