
नगर जिल्ह्यात पोलीस बदल्यांचा संभ्रम; कर्मचारी व कुटुंबीय चिंतेत
अहिल्यानगर : नगर जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत सध्या मोठा संभ्रम व अस्वस्थता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रशासकीय बदल्यांची अपेक्षा होती. काही विभागांमध्ये त्या पूर्ण झाल्या असल्या तरी पोलीस विभागात मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.
जिल्ह्यात सध्या ४५० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत. अनेकांनी बदल्यांसाठी अर्ज करून पर्यायही सुचवले आहेत. मात्र, जून महिना जवळ येऊनही शाळा सुरु होण्याच्या उंबरठ्यावर असताना त्यांना अजूनही निश्चित माहिती मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये प्रचंड मानसिक तणाव आणि गोंधळाचं वातावरण आहे.नवीन बदली होणार की नाही ? झालीच तर कधी होणार? मुलांचे शिक्षण, प्रवेश प्रक्रिया, कुटुंबाचे नियोजन यावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. शाळा सुरु झाल्यानंतर जर बदली झाली, तर नवीन ठिकाणी शाळेत प्रवेश मिळेल का? हा मोठा प्रश्न कर्मचारी वर्गासमोर उभा आहे.त्याचबरोबर संलग्न बदली ही आणखी एक गंभीर बाब बनली आहे. काही कर्मचाऱ्यांना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठिकाणी बदलीचे आदेश मिळाले असले तरी संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी त्यांना कार्यमुक्त करत नाहीत.
यामागे ‘संलग्न ठेवण्याचे कारण’ दिले जाते. मात्र, हे निर्णय वरिष्ठांच्या मर्जीवर अवलंबून असल्याने अनेक पोलीस ठाण्यांमध्ये वर्षानुवर्षे तेच कर्मचारी कार्यरत आहेत, तर काहींना सतत बदल्यांचा सामना करावा लागतो.माजी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी बदल्यांसाठी प्रक्रिया सुरू केली होती. पात्र कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते. मात्र, त्यांची मुंबईला बदली झाल्यानंतर ही प्रक्रिया थांबली. आता नवीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी नुकताच पदभार स्वीकारल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्या निर्णयांकडे लागले आहे.पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी स्पष्ट आहे. बदली प्रक्रियेबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यायकारक संलग्नाच्या प्रक्रियेला थांबवावे आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांच्या गरजांचा विचार करावा. पोलीस कर्मचारी अहोरात्र जनतेची सेवा करतात, कायदा- सुव्यवस्थेसाठी जीव धोक्यात घालतात.