
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये रविवारी कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात हैदराबादने कोलकाताला तब्बल ११० धावांनी हरवले. या दोघांचा या हंगामातील शेवटचा सामना होता. या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा विस्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेनने इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये इतिहास रचला. त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दिल्लीत खेळवल्या गेलेल्या सामन्यात केवळ ३७ बॉलमध्ये शतक ठोकत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान तिसरे शतक ठोकले.
क्लासेनने बनवला रेकॉर्ड
क्लासेनचे हे शतक आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंत संयुक्तपणे तिसरे वेगवान शतक आहे. तसेच एखाद्या परदेशी खेळाडूकडून दुसऱे वेगवान शतक. या यादीत केवळ क्रिस गेल आहे. त्याने २०१३मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध ३० बॉलमध्ये शतक ठोकले होते.
क्लासेनच्या तुफानी खेळीच्या जोरावर हैदराबादने २७८ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील हा तिसरा सर्वात मोठा स्कोर आहे. आयपीएलमध्ये अव्वल ५ धावसंख्येमध्ये चार वेळा हैदराबादचे नाव आहे.
असा होता सामना
या सामन्यात टॉस जिंकत हैदराबादने पहिल्यांदा फलंदाjजीचा निर्णय घेतला होता. हैदराबादने हेनरिक क्लासेनच्या ३७ धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर कोलकातासमोर २७९ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र कोलकाता संपूर्ण संघ १९व्या षटकांत पॅव्हेलियनमध्ये परतला. हैदराबादचा संघ या हंगामात सहाव्या स्थानावर राहिला. त्यांनी या हंगामात १४ पैकी ६ सामने जिंकत १३ गुण मिळवले. तर कोलकाताचा संघ ५ सामन्यात विजयी झाला आणि १२ गुणांसह आठव्या स्थानावर गेला.