Wednesday, May 28, 2025

ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीरायगड

कोंझर घाटातील रस्ता खचला; महाड-रायगड मार्ग बंद

कोंझर घाटातील रस्ता खचला; महाड-रायगड मार्ग बंद

किल्ले रायगड परिसरातील गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला


संजय भुवड


महाड : महाड-रायगड रस्त्यावर कोंझर घाटातील मोठ्या धबधब्या समोरील रस्ता कालपासून कोसळत असलेल्या पावसाच्या पाण्याच्या झोतात खचून वाहून गेल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे किल्ले रायगड परिसरातील गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला असून या भागातील जनतेचे आणि पर्यटकांचे मोठे हाल झाले आहेत.


महाड तालुक्यात गेल्या २४ तासापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातून वाहणारे धबधबे मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहेत. महाड रायगड मार्गावर कोंझर घाटात असलेल्या मोठ्या धबधब्या समोर एका मोरीचे काम सुरु असून हे काम अर्धवट अवस्थेत असताना या धबधब्यातून मोठ्या प्रवाहाने पाणी वाहू लागल्याने हा रस्ता खचून वाहून गेला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.



महाड रायगड रस्त्याचे काम गेल्या चार वर्षा पासून अक्षय कस्ट्रक्शन या ठेकेदारामार्फत सुरु असून या मार्गावरील अनेक मो-या तसेच रस्त्याचे काम आजही अर्धवट अवस्थेत आहे.


दोन दिवसांपुर्वी खासदार सुनिल तटकरे यांनी लाडवली पुलाची पाहणी केल्यानंतर या पुलाचे काम दोन दिवसात सुस्थितीत करावे असे आदेश देत कामात दिरंगाई करणा-या ठेकेदाराला दिवसाला १० हजाराचा दंड ठोठावण्याचे आदेश बजावले होते. त्यानंतर अवघ्या दोन दिवसातच हा मार्ग बंद होण्याची नौबत आली असून या मार्गावर अर्धवट अवस्थेत असणा-या मो-यांच्या कामाच्या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रायगड मार्गावरील जनतेकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment