मुंबई : महाराष्ट्रात ऐन मे महिन्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवार सकाळपासूनच संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मान्सूनने महाराष्ट्रातील काही भाग व्यापला आहे. मुंबईसह पुणे आणि सोलापुरातही नैऋत्य मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आठवड्याची सुरुवात दमदार पावसाने झाली आहे. आज म्हणजेच सोमवार २६ मे २०२५ रोजी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड ,लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
मान्सून केरळमध्ये पोहोचला आणि महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस सुरू झाला. संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागात दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे शहरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे. शेतीच्या कामांचे वेळापत्रक पुरते बिघडले आहे.
हवामान विभागाचा धक्कादायक अंदाज
आता सलग तीन दिवस पावसाची शक्यता असली तरी मे महिन्याच्या अगदी शेवटच्या दिवसांमध्ये पाऊस पडणार नाही. ही स्थिती २८ किंवा २९ मे पासून निर्माण होईल. हीच स्थिती पाच जूनपर्यंत कायम राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.