
पुणे: राज्यात मान्सूनने पहिल्याच दिवशी धमाकेदार एन्ट्री केली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यात देखील पावसाची भुरभुर कायम आहे. दरम्यान, जेजुरी परिसरात देखील आज सकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे जेजूरी गडाला धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे,
आज सकाळी अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबा देवस्थानच्या (Jejuri Khandoba Temple) जेजूरी गडाच्या पायऱ्यांवरून पावसाचे पाणी धो धो वाहू लागले. यामुळे भाविकांची तसेच जेजूरी गडावर असलेल्या हार विक्रेत्यांची प्रचंड धावपळ झाली.
जेजूरीच्या नऊ लाख पायऱ्यांवर मूसळधार
जेजुरी जवळच्या नाझरे धरणात काल आलेल्या टॉरनेडोनंतर अतिशय जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जेजुरी गडाच्या पायऱ्यांना धबधब्याचं रुप आलं होतं. अवघ्या काही तासात इथं ढगफुटीसारखा पाऊस झाला. या पावसाचा वेग हा इतका प्रचंड होता की, जेजुरीकरांनी आतापर्यंत पहिल्यांदाच पायऱ्यांवरुन असं पाणी वाहताना पाहिलं. जेजुरीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Instagram वर ही पोस्ट पहा
अनेकांच्या घरात पाणी शिरले
सलग अर्धा ते पाऊणतास झालेल्या पावसाने नाले व बंधारे तुडुंब भरले, ज्यामुळे अनेकांच्या घरात ही पाणी शिरले. मोरगाव रस्त्यालगतच्या घरात पाणी घुसल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. नगरपालिकेने ताबडतोब उपाययोजना कराव्यात अशी स्थानिकांकडून मागणी केली जात आहे.