Sunday, May 25, 2025

अग्रलेख

नीती आयोगाची बैठक अन् मोदी मंत्र

नीती आयोगाची बैठक अन् मोदी मंत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दहाव्या नीती आयोगाच्या गव्हर्निंग कॉन्सिलची बैठक शनिवारी दिल्लीत पार पडली. नीती आयोग ही संकल्पना मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच्या काळात आली. तत्पूर्वी योजना आयोग होता आणि तो पंडित नेहरूंनी स्थापन केला होता. पण त्या योजना आयोगाच्या काळात राज्यांना काहीच अधिकार नव्हते आणि केवळ केंद्राच्या मम ला मम म्हणण्याशिवाय त्यांच्याकडे काहीही काम नव्हते. पण मोदी आल्यापासून राज्यांना अधिक सरकारी कारभारात आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार मिळाला आणि राज्ये तो आपला अधिकार गाजवू लागले, हे मोदी यांचे उपकार आहेत हे मान्य करायला हवे. तुलना करायची गरज नाही पण मोदी आल्यापासूनच राज्यांना आपल्या केंद्रातील वाट्यानुसार केंद्राकडून अधिक काहीतरी मिळू लागले ही वस्तुस्थिती आहे, पण ते असो. कालच्या बैठकीत मोदी यांनी आपली सर्वसमावेशक प्रशासन या प्रति कटिबद्धता व्यक्त केली आणि त्याला मोठा अर्थ आहे. कारण या आधी सर्वसमावेशकता नव्हतीच. केवळ काँग्रेसकालीन केंद्र सरकारची हडेलहप्पी होती. पण आता राज्यांना आपला वाटा मिळू लागला आहे.

मोदी यांनी कालच्या बैठकीत एक उत्कृष्ट विचार मांडला आहे आणि तो म्हणजे सध्या सुरू असलेल्या क्रिकेट संघासारखा आहे. मोदी म्हणाले की टीम इंडिया हे आपले मार्गदर्शक तत्त्व असले पाहिजे. म्हणजे टीम इंडिया जसे एक
संध राहून क्रिकेट खेळते तसेच आपण त्यापासून काहीतरी शिकले पाहिजे.

सर्व राज्ये आणि केंद्र सरकारे यांनी आपापसातील मतभेद मिटवून देशाच्या विकासासाठी एकत्र काम केले, तरच आपली प्रगती होईल हा तो विचार. यालाच संघराज्यवाद म्हणतात. विरोधकांना विशेषतः काँग्रेसला तो मान्य नाही. काँग्रेसने मोदी यांनी आपल्या काळात संघराज्यवाद संपवण्याचा प्रयत्न केला आहे असा अपप्रचार नेहमीच केला आहे. पण मोदी यांनी तो किती खोटा आणि बिनबुडाचा आहे हे वेळोवेळी सिद्ध केले आहे आणि त्याप्रमाणे आपले वर्तनही ठेवले आहे. राज्यांचा देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा असतो आणि प्रत्येक राज्य विकसित झाले, तरच देश विकसित होऊ शकतो असा एक जबरदस्त विचार मोदींच्या प्रतिपादनामागे आहे आणि तो शंभर टक्के खरा आहे.

कारण राज्ये जर एकत्रित प्रगत झाली, तरच देश प्रगत होऊ शकतो हे सत्य आहेच. पंतप्रधान मोदी म्हणाले की प्रत्येक राज्याने किमान एक पर्यटनस्थळ विकसित करावे जे जागतिक दर्जाच्या बरोबरीचे असेल. त्यात सर्व सुविधा आणि मूलभूत संरचना असेल. यामुळे राज्य विकसित होतीलच पण देशही विकसित होऊन देशाची वाटचाल विकसित देश २०४७ कडे होईल. हाच तर पंतप्रधान मोदी यांचा मूलमंत्र आहे आणि हाच त्यांच्या भाषणाचे सार होते. पंतप्रधान मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे विकासाची चाके जलद गतीने फिरली पाहिजेत. केद्र आणि राज्ये जर या दिशेने काम करतील तर कोणतेही उद्दिष्ट असाध्य नाही. यालाच एकात्मिक संघराज्य वाद म्हणतात आणि हाच विचार आपल्या आतापर्यंतच्या विवेचनात दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडला होता. पण त्याकडे आपण काँग्रेसच्या नादाला लागून दुर्लक्ष केले. पण मोदी यांच्या काळात आपल्याला त्याचे महत्त्व जाणवले आहे आणि त्यांचे विचार आपण पुन्हा मांडू लागलो आहोत. मोदी म्हणाले त्याप्रमाणे विकसित भारत हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे आणि ती १४० कोटी भारतीय लोकांची आकांक्षा आहे. देशाला २०४७ पूर्वी विकसित भारत बनवण्यासाठी पंतप्रधानांनी प्रत्येकाने विकसित भारत बनवण्याच्या स्वप्नाचा भाग बनले पाहिजे हे वास्तवदर्शी प्रतिपादन केले. प्रत्येक राज्य विकसित, प्रत्येक नगरपालिका विकसित आणि प्रत्येक ग्रामपंचायत विकसित बनली तरच देश विकसित बनू शकतो असे प्रतिपादन मोदी यांनी केले.

दीनदयाळ उपाध्याय यांचा विचार तरी यापेक्षा वेगळा काय होता. मोदी यांनी विकसित देश बनवतानाच प्रत्येक नागरिकाला आणि विकासाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या नागरिकाला विकासात योग्य वाटा मिळेल हे पाहिले पाहिजे. कारण अमर्त्य सेन यांच्या विकासाचा दृष्टीकोन हाच तर होता. अर्थात या पंतप्रधानांच्या नीती आयोगाच्या बैठकीलाही पक्षीय राजकारणाचे विशेषतः विरोधकांच्या विचारांचे आणि राजकारणाचे ग्रहण लागलेच. कारण काँग्रेसने या बैठकीला विरोध केला आणि राहुल गांघी यांचे ते कामच आहे. त्यांच्याकडून याबाबत वेगळी अपेक्षा ठेवता येणारच नाही. पण सर्व मुख्यमंत्रीही या बैठकीला हजर राहिले नाहीत. त्यांची कारणे त्यांच्याकडे असोत, पण पंतप्रधानाच्या उपस्थितीत बोलवलेल्या बैठकीला अनुपस्थित राहण्याचे धैर्य या मुख्यमंत्र्यांनी दाखवले त्याबद्दल खरे तर संघराज्याचेच कौतुक करायला हवे. कारण इतके स्वातंत्र्य मुख्यमंत्र्यांना असते. सर्वात शेवटी म्हणजे मोदी यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला तो महिलांच्या सहभागाचा.

महिलांना आदरपूर्वक आम्ही आपल्या वर्कफोर्समध्ये सहभागी करून घेतले पाहिजे हा त्यांचा मुद्दा अत्यंत कळीचा आहे. कारण महिलांना जर सामावून घेतले नाही, तर विकासात काही अर्थ उरणार नाही. विकास म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन केलेला विकास. हा मोदी यांचाच मूलमंत्र आहे. त्यानुसारच मोदी यांनी वरील घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या भाषणातून एक साध्य झाले आहे. ते म्हणजे विकसित भारत होण्यासाठी भारत सज्ज झाला आहे आणि आता तो त्यानुसार वाटचाल करणार आहे. विरोधी पक्ष कितीही राजकारण करोत अथवा सहकार्य करोत. पण मोदी यांचा वर्ज्रनिर्धार कायम राहील आणि विकासाच्या मार्गावर भारत तशीच अविरत वाटचाल करत राहील अशी ग्वाही या निमित्ताने सर्वांना मिळाली आहे. विरोधकांना त्याचे राजकारण लखलाभ असो. कारण काँग्रेसचे जयराम रमेश यांनी मोदी यांच्याबद्दल म्हटले की ही अयोग्य बैठक आहे. पण रमेश यांच्या काँग्रेसच्या काळात नियोजन आयोगाच्या बैठका कशा चालतात हे सार हे साऱ्यांना माहीत आहे. त्यामुळे रमेश काहीही म्हणोत, मोदी आणि भारत यांचा अश्व आता धावत राहणार आहे.
Comments
Add Comment