Sunday, May 25, 2025

अर्थविश्व

प्रवासी वाहन विक्रीत महाराष्ट्र अव्वल

प्रवासी वाहन विक्रीत महाराष्ट्र अव्वल
नवी दिल्ली : मागील आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक प्रवासी वाहन विक्री नोंदवली आहे, तर उत्तर प्रदेश दुचाकी विक्रीत आघाडी मिळविली, अशी माहिती वाहन निर्मात्यांची नेतृत्वदायी संघटना ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स (सियाम)’ने नुकतीच दिली. सियामच्या आकडेवारीनुसार, वर्ष २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रात ५,०६,२५४ प्रवासी वाहनांची विक्री झाली. एकूण प्रवासी वाहन विक्रीत राज्याचा वाटा ११.८ टक्के राहिला आहे, त्यानंतर उत्तर प्रदेश ४,५५,५३० वाहने (१०.६ टक्के) आणि गुजरात ३,५४,०५४ प्रवासी वाहनांच्या (८.२ टक्के) विक्रीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

कर्नाटकमध्ये ३,०९,४६४ प्रवासी वाहनांची विक्री झाली, तर त्यांचा वाटा एकूण विक्रीत ७.२ टक्के होता. मागील वर्षात उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक २८,४३,४१० लाख दुचाकींची विक्री झाली. एकूण दुचाकी विक्रीत उत्तर प्रदेशचा वाटा १४.५ टक्के आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात २०,९१,२५० लाख दुचाकींची विक्री झाली. तामिळनाडूमध्ये १४,८१,५११ दुचाकी विकल्या गेल्या आहेत. वाणिज्य वाहन विभागात, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक १,३४,०४४ वाणिज्य वापराची वाहने विकली गेली. एकूण राष्ट्रीय विक्रीत राज्याचे योगदान १४ टक्के होते, त्यानंतर उत्तर प्रदेशात ८९,१२६ वाहने (९.३ टक्के) आणि गुजरातमध्ये ८२,४३३ वाणिज्य वाहनांची (८.६ टक्के) विक्री झाली. उपलब्ध आकडेवारीनुसार, तीन चाकी वाहनांच्या विभागात देखील उत्तर प्रदेशात सर्वाधिक ९३,८६५ तीन चाकी वाहनांची विक्री झाली.
Comments
Add Comment