
विक्रोळी, भांडुप, पवईतील नागरिकांसाठी इशारा
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या एस विभागातील विक्रोळी, भांडुप आणि पवई येथील उंच उतार आणि सैल माती असलेल्या भागाला मुंबई उपनगर जिल्हाधिकारी विभागाने भूस्खलनाचा इशारा दिला आहे. या विभागात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडतो. तसेच हे क्षेत्र भूकंपीय क्षेत्र ३ (मध्यम भूकंप प्रवण प्रदेश) अंतर्गत येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई महापालिकेच्या एस विभागात भूस्खलनामुळे होणारी घटना टाळण्यासाठी किंवा जीवितहानी रोखण्यासाठी म्हाडाने भारताचे भूगर्भीय सर्वेक्षणामार्फत नोदविलेल्या १३ संवेदनशील ठिकाणी संरक्षक भिंती बांधल्या आहेत.
तसेच एस विभागातील सूर्यनगर, विक्रोळी (प.), इंदिरा नागा, पवई, हनुमान नगर, भांडुप (प.), नादर चाळ, भांडुप (प.), खिंडीपाडा, भांडुप (प.), तुलशेतपाडा, भांडुप (प.), खिंडीपाडा, भांडुप (प.), या ७ठिकाणी भूस्खलन टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत तसेच मुंबई महापालिकेच्या एस विभागाच्या वतीने सुरक्षित ठिकाणी किंवा महापालिकेच्या तात्पुरत्या निवाऱ्यामध्ये स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. यासाठी पालिकेच्यावतीने विक्रोळी (प.) आणि भांडुप (प.) या डोंगराळ झोपडपट्टी भागात माहितीपूर्ण बॅनर आणि फ्लेक्स नागरिकांच्या माहितीसाठी लावले आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी विक्रोळी येथील सूर्यानगर या दरड प्रवण क्षेत्राला भेट देऊन येथे संरक्षक जाळी बसवण्याचे निर्देश दिले होते. दरवर्षी याठिकाणी दुर्घटना घडत असल्याने स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे, असे संबंधित अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते. शिंदे यांनी भांडुप येथील उषानगर, उषा कॉम्प्लेक्स, नेहरूनगर नाला वडाळा, दादर येथील नालेसफाईची पाहणी केली.
'एस' विभागाने तात्पुरत्या निवारागृहांची सोय केलेली ठिकाणे
टेंभीपाडा महानगरपालिका शाळा, भांडुप (प.)
तिरंदाज मराठी प्राथमिक शाळा, पवई
पासपोली मराठी प्राथमिक शाळा, पवई
भांडुप महानगरपालिका शाळा, भांडुप
कन्नमवार नगर महानगरपालिका शाळा, विक्रोळी (प.)
टागोर नगर महानगरपालिका शाळा, विक्रोळी (प.)
एमव्हीआर शिंदे मार्ग पालिका शाळा, भांडुप (प.)
वर्षा नगर एमपीएस शाळा, विक्रोळी (प.)
नेहरू नगर एमपीएस शाळा, कांजूरमार्ग (प.)
तुलशेत पाडा महानगरपालिका शाळा, भांडुप (प.)