
नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, शेतीचं मोठं नुकसान, वाहतूक ठप्प
मुंबईत सखल भागांत पाणी साचले; वाहतूक व्यवस्थेवर परिणाम
मुंबई : महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत सखल भागात पाणी साचले असून, वाहतूक ठप्प झाली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांत शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, हवामान खात्यानं अधिकृतपणे राज्यात मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा केली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, आजही राज्यात जोरदार पावसाचा इशरा हवामान विभागाने दिला आहे. जाणून घेऊयात राज्याच्या कोण कोणत्या भागात पाऊस सुरु आहे.

पुणे जिल्ह्यात संततधार पावसामुळे पूल पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
पुण्यातील दौंड तालुक्यात मुसळधार पावसामुळे छोट्या पुलांवरून पाणी वाहू लागलं आहे. मसनरवाडीतील मेरगळमळा गावात ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे गावक-यांना प्रवास कठीण झाला आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

मुंबई : गेल्या आठवडाभरापासून राज्यात विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या झळा त्यामुळे कमी झाल्या असल्या तरीही ...
परशुराम घाटातील काम पावसामुळे ठप्प
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड धोक्याच्या ठिकाणी सुरू असलेलं लोखंडी जाळी बसवण्याचं आणि गॅबियन वॉल उभारणीचं काम मुसळधार पावसामुळे थांबलं आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून, पावसाआधी पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू होते.

सिंधुदुर्गमधील मांगेली धबधबा प्रवाहित, पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी
दोडामार्ग तालुक्यातील मांगेली येथील धबधबा मे महिन्यातच प्रवाहित झाला आहे. महाराष्ट्र-गोवा-कर्नाटक सीमेवरील हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. दाट धुके, पावसाचं सौंदर्य आणि तिलारी धरणाचं दृश्य पर्यटकांना भुरळ घालत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर इनोवा गाडी वाहून गेली
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीजवळ पाणी साचल्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील एक इनोवा गाडी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.

मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे राज्यात पावसात घट होणार मुंबई : या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो २५ मे रोजी ...
पालघरमध्ये भातशेतीचं ५५ कोटींचं नुकसान
पालघरमध्ये पावसामुळे उन्हाळी भातशेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अंदाजे ५५ ते ६० कोटींचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. अजूनही पाऊस सुरू असल्यामुळे शेतक-यांच्या हातात आलेलं पीक हिरावून जाण्याची शक्यता आहे.
बुलढाणा जिल्ह्यात सर्व तालुक्यांत पावसाची बॅटिंग
बुलढाणा, खामगाव, नांदुरा, चिखली तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडतोय. सकल भागांत पाणी साचलं आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले आहेत.
वाशिम जिल्ह्यात जनावरांचा गोठा कोसळला
वादळी वा-यांसह पावसामुळे पिंपळगावमधील शेतकरी राहुल दंडे यांचा जनावरांचा गोठा कोसळला आहे. चारा व खाद्यपदार्थ भिजून खराब झाले. काही जनावरंही जखमी झाली आहेत.
सोलापूर जिल्ह्यात पाणीपातळी वाढली, उजनी धरणात ४ टीएमसी साठा
गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणात ४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. चंद्रभागा नदीची पाणीपातळीही १ मीटरने वाढली असून, पंढरपूरला २५ जूनपर्यंत पुरेसं पाणी मिळेल.
सातारा जिल्ह्यात कोयना नदीवरील सर्व बंधारे ओव्हरफ्लो
कोयना, कृष्णा नदींची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. निसरे, तांबवे बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलं आहे. खोडशी डॅमही पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला आहे. पुढील चार दिवसांसाठी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिला आहे.
बीडमध्ये आठवड्यापासून मुसळधार पाऊस, कपिलधारचा धबधबा सुद्धा प्रवाहित
बीड जिल्ह्यात ८ दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे कपिलधारचा प्रसिद्ध धबधबा सुद्धा मे महिन्यातच प्रवाहित झाला आहे. यंदा मे महिन्यात ११९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कांदा शेतात सडला
मान्सूनपूर्व पावसामुळे काढणीला आलेला कांदा शेतातच सडून जात असल्याच्या तक्रारी अनेक शेतक-यांनी केल्या आहेत. कांदा उत्पादन करणा-या भागात या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे.
बळीराजा संकटात, सजग राहण्याची गरज
राज्यात मान्सूनपूर्व पावसाने धोक्याची घंटा वाजवली आहे. शेती, वाहतूक, घरं, धरणं, पूल यावर मोठा परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढील काही दिवस पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहून सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.