Tuesday, May 27, 2025

महाराष्ट्र

देहू संस्थानला १ कोटींचा निधी मंजूर

देहू संस्थानला १ कोटींचा निधी मंजूर

पिंपरी : देहूगाव वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक परंपरेचा गौरव करणारा संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन महोत्सव ओतूर येथे अत्यंत भक्तिभावाने साजरा होत आहे. या निमित्ताने ओतूर गावात जगद्गुरू तुकाराम महाराज, त्यांचे सद्गुरू आणि संत चोखोबा महाराज यांचा त्रिवेणी संगम साधल्याची भावना भाविकांत दाटून आली.


या महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित भाविकांच्या माध्यमातून अक्षय महाराज भोसले यांनी प्रकाशनासाठी देहू संस्थानच्या वतीने एक कोटींची मागणी केली असता महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत देहू संस्थानसाठी संत तुकाराम महाराज अभंग गाथेच्या प्रकाशनासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हा निधी ४८ तासांत अधिकृत खात्यावर वर्ग केला जाणार आहे. संत श्रीतुकाराम महाराजांच्या गाथेचे ईबूक करून विश्वभर संत साहित्य नेणार अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली.


यावेळी सामंत म्हणाले, "ज्यांनी 'तुकाराम तुकाराम' नामाचा उच्चार जरी केला तरी यमालाही थरकाप सुटतो, त्या संतांच्या गाथेचे रक्षण साक्षात भगवंताने केले. ही गाथा म्हणजे पाचवा वेद आहे. यापूर्वी ज्ञानेश्वरी छपाईसाठी देखील आपण एक कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला." माऊली महाराज कदम (छोटे माऊली) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील विविध भागांतून लक्षावधी वारकरी सहभागी झाले आहेत. ही अभूतपूर्व उपस्थिती वैश्विक विक्रमात नोंदवली जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी संत नामदेव महाराज यांचे वंशज केशवमहाराज नामदास, देहू देवस्थान विश्वस्त जालिंदर महाराज मोरे उपस्थित होते.

Comments
Add Comment