Wednesday, May 28, 2025

कोकणब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीरत्नागिरी

दापोली-खेड रस्ता बंद! जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा इशारा

दापोली-खेड रस्ता बंद! जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा इशारा

खेड : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, त्याचा परिणाम दापोली-खेड प्रमुख राज्य मार्गावर दिसून आला आहे. खेड तालुक्यातील फुरुस गावाजवळ पुलाचे काम सुरू असून, यासाठी तयार करण्यात आलेला पर्यायी मार्ग पावसामुळे चिखलमय झाला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे. आता ही वाहतूक दस्तुरीवरून पालगडमार्गे वळवण्यात आली आहे.


दरम्यान, रायगड जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण २२४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये मुरुड तालुका ३७१ मिमी, श्रीवर्धन ३०७ मिमी, तर सर्वात कमी पेण तालुका ५० मिमी पावसासह सरासरी १४०.५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.



रत्नागिरी जिल्ह्यातही एकूण ९९७.९३ मिमी पाऊस पडला असून, सरासरी ११०.८८ मिमी इतकी नोंद झाली आहे. यामध्ये मंडणगड (२११.२५ मिमी) सर्वाधिक आघाडीवर आहे, तर राजापूर (५९.२५ मिमी) सर्वात कमी पावसाची नोंद आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४६६ मिमी एकूण पाऊस पडला असून, सरासरी ५८.२५ मिमी इतकी नोंद झाली आहे. कुडाळ, कणकवली आणि वैभववाडी या तालुक्यांत ६० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे.



जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर


जगबुडी नदीवरील भराणे नाका पुलाजवळ सकाळी १० वाजेच्या सुमारास पाण्याची पातळी ५ मीटरवर पोहोचली असून, तीच अलर्ट पातळी असल्याने धोका पातळीच्या अगदी जवळ पाणी पोहोचले आहे.


हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील ३ ते ४ तासांमध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. यावेळी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment