
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नांदेडच्या शंखनाद सभेतून ग्वाही
नांदेड : ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईतून भारताने आपली क्षमता आणि ताकद जगासमोर सिद्ध केली असून भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मोदी सरकारने केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर जगाला दिला आहे. आता देशातील नक्षलवाद्यांचे अड्डेही उद्ध्वस्त करण्यात येत असून ३१ मार्च २०२६ या तारखेपूर्वी या देशाच्या भूमिवरून नक्षलवादाचा नायनाट झालेला असेल, या संकल्पाचा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी नांदेड येथील प्रचंड शंखनाद सभेत बोलताना केला.
गेल्या २२ एप्रिलला पहलगाममध्ये पाक प्रशिक्षित अतिरेक्यांनी आपल्या निष्पाप पर्यटकांची भ्याड हत्या केली, तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना धूळ चारण्याचा इशारा दिला होता. १० वर्षांपूर्वीची काँग्रेसची सत्ता संपली आहे, आता मोदी सरकार आहे, याचा पाकिस्तानला विसार पडला. पहलगाम हल्ल्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूर कारवाईत पाकिस्तानात घुसून शेकडो पाकिस्तानी अतिरेक्यांना ठार करून केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर संपूर्ण जगाला एक संदेश दिला गेला आहे.
भारताच्या जनतेवर, सीमेवर हल्ला झाला तर ‘गोली का जवाब गोले से दिया जायेगा’, हा संदेश देऊन ७ मे रोजी २२ मिनिटांत अतिरेक्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्याचे काम भारतीय सेनेने केले. ८ मे रोजी पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले केले, पण आपल्या सक्षम सुरक्षा व्यवस्थेने एकही क्षेपणास्त्र किंवा ड्रोन भारताच्या भूमीवर घुसू न देता हवेतच त्यांची वासलात लावल्याचे शहा यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश भाजपा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री व खा. अशोक चव्हाण, आदी नेत्यांचीही या विशाल सभेत भाषणे झाली.