
महाराष्ट्रनामा
महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात सर्वाधिक काळ म्हणजे आता तर सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदी राहिलेले अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा स्वतःचा नवीन रेकॉर्ड निर्माण केला आहे. तो ब्रेक करण्यासाठी देखील आता दुसऱ्या कोणालाही कोणत्याही मंत्र्याला तब्बल सात वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व्हावे लागणार आहे. अर्थात विलासराव देशमुखांपासून ते अगदी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सर्वच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम करावे लागण्याची वेळ अजित दादा पवार यांच्यासारख्या मुरलेल्या मुरब्बी राजकीय नेत्यावर का आली याचा देखील शोध घेण्याची गरज आहे.
अजित दादा पवार हे ज्या पवार कुटुंबातून येतात त्या पवार कुटुंबात खुद्द त्यांचे काका शरद राव पवार यांनी महाराष्ट्राचे तब्बल चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले आहेत, पण अद्यापपर्यंत राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यानंतरचे सर्वेसर्वा अजित पवार यांना मात्र मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिल्याचे प्रत्येकवेळी स्पष्ट झाले आहे. अजित पवार हे सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले पण एकदाही मुख्यमंत्री झाले नाही याचे प्रमुख कारण हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीशी आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तसेच राजकीय इतिहासात उपमुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ अनुभव जर कोणी घेतला असेल तर तो अजितदादा पवार यांनी घेतला आहे. अजित पवार हे जरी शरद पवार यांचे पुतणे असले तरी देखील त्यांना स्वतंत्र अशी राजकीय महत्त्वकांक्षा आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवण्याची त्यांची महत्त्वकांक्षा ही त्यांनी काही कधीही लपवून ठेवलेली नाही. मात्र त्यांच्या राजकीय दुर्दैवाने म्हणा त्यांना महाराष्ट्राचा तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्री होता आले पण एकदाही मुख्यमंत्रीपद अजित पवार यांच्या वाट्याला आलेले नाही. अगदी यासाठी विलासराव देशमुख यांच्यासारख्या ज्येष्ठ मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीचा विचार केला, तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात देखील उपमुख्यमंत्री म्हणून अजित दादा पवार होते. ते अगदी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ते उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातदेखील अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. अगदी काल-परवाचे एकनाथ शिंदे हे अडीच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून धडाकेबाज कामगिरी महाराष्ट्रात केली. मात्र अजित पवार यांना काही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता आले नाही. तसे बघायचे झाल्यास याला कारणीभूतही अजित पवार यांचे राजकारण आणि त्यांचे राजकीय मित्र हेच आहेत. तसे बघायचे झाल्यास शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातल्या साडेतीन जिल्ह्यांत म्हणजेच बारामती, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये संपून जातो. अजित पवार यांना देखील हेच सूत्र लागू होते कारण ज्या साडेतीन जिल्ह्यांच्या ताकदीवर त्यांचे काका शरद पवार यांनी महाराष्ट्र राज्य केले तेच साडेतीन जिल्हे अजित पवार यांच्या पाठीशी उभे राहिले. अर्थात अजित पवार यांनी आपली राजकीय ताकद वाढवायचा निश्चितच प्रयत्न केला.
तथापि त्यांना फारसे त्यात काही मिळाल्याचे गेल्या काही निवडणुकांमधून तरी आढळून आलेले नाही. अर्थात असे सर्व असले तरी अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत हे दुर्लक्षून चालणार नाही. मात्र त्यांना जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करायचे असेल त्यासाठी सर्वात आधी जर त्यांना कोणती काळजी घ्यावी लागणार आहे ती म्हणजे त्यांना त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीमध्ये गुंड पुंडांचे जे पेव फुटले आहे याला संपुष्टात आणावे लागणार आहे. जर का अजित पवार यांच्यासारखा कठोर आणि शिस्तप्रिय राजकारणी नेता स्व पक्षातील बेशिस्त गुंडगिरीला वेसण घालू शकला नाही, तर मुख्यमंत्री म्हणून असा नेता महाराष्ट्राला काय न्याय देणार असा प्रश्न जर उद्या कोणी उपस्थित केला, तर त्याला नैतिकदृष्ट्या उत्तर देण्याची तयारीदेखील अजित पवार यांची असली पाहिजे. आधीच बीडमधील धनंजय मुंडे आणि कराड यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे नाव बदनाम झाले आहे. त्यात आता पिंपरी-चिंचवडमधील हगवणे कुटुंब प्रकरणाची भर पडली आहे. मुंडे असो की हगवणे असे गुंड-पुंड आणि माफिया हे अजित पवार यांनाच का चिकटतात हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये मूळ प्रश्न असा उपस्थित होतो की मुळात असे गुंड माफिया हे अजित पवार यांच्या भोवती कसे जमा होतात हा मूळ प्रश्न आहे आणि याचे उत्तर जरी किमान अजित पवार यांनी देणे अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकारणामध्ये जे जे मुख्यमंत्री झाले अगदी त्यांच्यामध्ये अजित पवार यांचे सख्खे काका शरद पवार यांचे उदाहरण जरी घेतले तरी शरद पवार हे महाराष्ट्राचे तब्बल चार वेळा मुख्यमंत्री झाले; परंतु जर १९९५चा हितेंद्र ठाकूर आणि पप्पू कलानी यांचा अपवाद वगळला तर त्यांनी देखील गुंडांच्या राजकारणापासून स्वतःचा राजकीय बचाव कसा होईल याची पुरेपूर काळजी घेतली होती. अशी काळजी घेण्यात अजित पवार हे कमी पडले का? याचाही विचार झाला पाहिजे. तसेच ज्या मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले मग ते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असो पृथ्वीराज चव्हाण असो उद्धव ठाकरे असो की अगदी एकनाथ शिंदे असो की आताचे देवेंद्र फडणवीस असो या सर्वच मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही माफियाला स्वतःशी कधीच पूर्णपणे चिकटू दिले नाही ही वस्तुस्थिती आहे. मग अजित पवार तेथे कोठे कमी पडले? याचेही आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. अजितदादा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे ही सर्वांचीच इच्छा आहे. मात्र इच्छा असणे वेगळी बाब आहे आणि प्रत्यक्षात अशा इच्छेची पूर्तता होणे ही वेगळी बाब आहे. अजित पवार हे केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी भावना असून उपयोग नाही, तर त्यासाठी अजित पवार यांना स्वतःच स्वतःच्या कार्यपद्धतीमध्ये आणि त्याचबरोबर स्वतःच्या भोवतीचे एक सत्तेचे विशिष्ट कोंढाळे निर्माण झाले आहे. यामध्ये आमुलाग्र बदल करणे ही काळाची गरज आहे. सत्तेला नेहमीच मुंगळे चिकटत असतात. मात्र जो प्रमुख सत्ताधारी आहे त्याने अशा मुंगळ्यांपासून स्वतःचे अस्तित्व हे कौशल्याने स्वतंत्र आणि अलिप्त राखायचे असते.
विलासराव देशमुख असो की पृथ्वीराज चव्हाण असो की अगदी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस असोत. या साऱ्याच मुख्यमंत्र्यांनी कोणतेही माफियाच्या अथवा गुंडाच्या हातात स्वतःच्या राजकारणाची सूत्रे कधीच दिली नव्हती. अजित दादा पवार हे देखील मुरब्बी आणि मुसंडी राजकारणी आहेत ते देखील एखाद्या जिल्ह्यापुरता वेगळा निर्णय घेत देखील असतील मात्र तरी देखील त्यांचे राजकारण हे देखील गुंड माफियांच्या भोवती फिरणारे नाही हे देखील लक्षात घेतले पाहिजे. जर अजित दादा पवार यांना धनंजय मुंडे वाल्मीक कराड आणि आता हगवणे अशा प्रवृत्तींपासून स्वतःचा बचाव करत मुख्यमंत्री पदापर्यंत वाटचाल करायची असेल, तर अशा प्रवृत्तीच्या मंडळींना कटाक्षाने त्यांच्या राजकीय प्रवासातून बाजूला करणे हे आता काळाची गरज आहे. अशा माफिया प्रवृत्तींपासून अजितदादा स्वतःचा बचाव करू शकले आणि स्वतःची एक स्वतंत्र वेगळी अशी प्रतिमा महाराष्ट्रात निर्माण करू शकले तरच भविष्यकाळात मुख्यमंत्रीपदाचा मुकुट हा त्यांच्या भाळी येऊ शकतो असे म्हणता येईल. पण जर का या अनुभवातूनही अजित पवार काही शिकलेच नाहीत आणि हीच गुंड आणि माफिया मंडळी त्यांच्याबरोबर आगामी काळात देखील बरोबर राहिली, तर मात्र अजित पवार यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न हे एक दिवस स्वप्न राहू शकेल असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. जर हे स्वप्न सत्यात साकारायचे असेल, तर अजित पवार यांना स्वपक्षातील गुंड आणि माफियांविरोधात कठोर भूमिका ही या पुढच्या काळात घ्यावी लागणार आहे. एवढे जरी त्यांनी लक्षात घेतले तरी या निमित्ताने खूप झाले एवढेच म्हणता येईल.
सुनील जावडेकर