
पुणे : मागील वर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर त्याची पूर्वसूचना नागरिक, तसेच पालिकेला देण्यात आली नव्हती. त्यामुळे शहरातील सिंहगड रोड परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले होते, असा आरोप नागरिकांनी केला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ही बाब अंत्यंत गांभीर्याने घेतली आहे.
धरणातून पाणी सोडण्याच्या आधी यंत्रणेला सज्ज होण्यासाठी दोन तास आधी सूचना देण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. धरणातून विसर्ग करण्याचा इशारा यंत्रणा भोंग्याच्या स्वरूपात पाणी शिरण्याचा धोका असलेल्या ठिकाणी कायमस्वरुपी बसवावी. त्याची माहिती पालिकेच्या नियंत्रण कक्षाने नागरिकांना द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जलसंपदा विभागाकडून पूरस्थिती नदीमध्ये धरणातून किती क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्यानंतर शहरातील कोणकोणत्या भागांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, याची माहिती महापालिकेला देण्यात आली आहे. उदाहरणार्थ किती क्युसेक पाणी सोडले, तर भिडे पूल पाण्याखाली जातो.
एकतानगर सोसायटीत किती क्युसेक पाणी आल्यावर ते घरांमध्ये शिरते, याची माहिती देण्यात आली. यासह सर्वसाधारण पाण्याची पातळी, सावधानतेची पातळी, धोक्याची पातळी आणि आपत्तीची पाणीपातळी या बाबीसुद्धा समजून सांगण्यात आल्या.
महापालिका, पीएमआरडीए, जलसंपदा, बांधकाम विभागाला दिलेल्या सूचना
- नदीलगत व नदीकाठावरील बांधकामांवर ठळकपणे निळी व लाल पूर रेषा दर्शवावी.
- नदीपात्रातील अतिक्रमणे पाहणी करून कार्यवाही करावी.
- जलसंपदा विभागाने नदीत पाणी सोडण्यापूर्वी गतीने माहिती पोहोचवावी नदी पात्रातील राडारोडा हटवावा.
- आपत्तीप्रसंगी आवश्यक जेसीबी, पोकलेन आदी यंत्रसामग्री गतीने उपलब्ध होण्यासाठी परिवहन विभागाने तयारीत राहावे.
- रस्ते तुंबू नयेत, यासाठी नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करावी.
जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रण कक्षाला सूचना
मेट्रोला दिलेल्या सूचना
पुणे व पिंपरी-चिंचवड पालिका क्षेत्रात मेट्रो रेल्वेमार्गिकेच्या व रस्त्यांची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. नदीपात्र, तसेच रस्त्याच्या बाजूस कामांमुळे निर्माण होणारा मलबा लवकरात लवकरात काढून घ्यावा. ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, तेथे सुरक्षा गार्ड, सुरक्षा रक्षकांना सज्ज ठेवून पोलीस विभागाशी समन्वय ठेवावा.
आरोग्य विभागाला दिलेल्या सूचना
आरोग्य विभागाने संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून नागरिकांना तात्काळ सेवा मिळेल, याबाबत नियोजन करावे. तालुकानिहाय रुग्णालय, खाटा, वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका, रक्तपेढी, औषधे, साधनसाहित्य तयार ठेवावे. साथीचे रोग व उपचारपद्धती आदीबाबत स्वतंत्र प्रणाली विकसित करावी. मान्सून काळात सर्पदंशाचे प्रमाण लक्षात घेऊन पुरेसा सर्पविष प्रतिबंधक लस साठा उपलब्ध ठेवावा.