Saturday, May 24, 2025

किलबिल

सूर्य कोठे जात नाही

सूर्य कोठे जात नाही

कथा : प्रा. देवबा पाटील


शालेय जीवनात आदित्य हा अभ्यासात अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धीचा विद्यार्थी होता. त्याच्या आजोबांना वाचनाची खूप आवड होती. विशेष म्हणजे त्यांना कोडे घालण्यात व सोडविण्यात अतिशय रस होता. एके दिवशी त्यांनी आदित्यला एक कोडे घातले. त्या कोड्यावर आदित्यने खूप विचार केला आणि त्याने त्याच्यापरीने त्या कोड्याचे उत्तर आजोबांना सांगितले. आजोबांना ते पटले; परंतु त्यांनी ते स्वीकारले नाही. रोजच्याप्रमाणे त्या दिवशी शाळेत दुपारच्या मधल्या सुट्टीत पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळील एका निंबाच्या झाडाच्या गार सावलीत आदित्य आणि त्याचे मित्र आपले डबे खाण्यास बसले होते. एवढ्यात एक १४-१५ वर्षांचा मुलगा प्लास्टिकच्या तीन पारदर्शक पिशव्यांमध्ये; एका पिशवीत राजगि­ऱ्याचे भरपूर लाडू, दुसऱ्या पिशवीत मक्याच्या थोड्याशा लाह्या व तिस­ऱ्या पिशवीत थोडेसे फुटाणे घेऊन तेथे आला. त्याच्या पोषाखावरून तर तो एक अतिशय गरीब मुलगा दिसत होता. बहुधा तो लाडू,
लाह्या व फुटाणे विकणारा असावा.


लाडू, लाह्या व फुटाणे विकण्यासाठी मुला-मुलींच्या प्रत्येक गटाजवळ जाऊनही कोणीही त्याच्याजवळून लाडू विकत घेतले नाही. शेवटी पुन्हा तो आदित्यच्या टोळीजवळच्या एका मोठ्या दगडावर येऊन बसला. त्याने आपल्या पिशवीतून एका फडक्यात बांधलेली आपली न्याहारी काढली. ती फडक्यामध्ये कागदाच्या जाड घडीमध्ये मोडून घडी करून ठेवलेली ती चतकोर कोरडी भाकर होती व त्या भाकरीवर कोरडीच बिनतेलाची थोडीशी लाल मिरच्यांची जाडीभरडी चटणी दिसत होती. तो ती भाकरी खाऊ लागला. तो आदित्यच्या कंपूच्या जवळच बसल्याने आदित्यला ते सारे काही स्पष्टपणे दिसत होते. तसेच त्यालाही या सगळ्यांच्या गप्पा चांगल्या स्पष्ट ऐकू येत होत्या.
आदित्य जेवता जेवता त्याच्या मित्रांना सांगू लागला, “अरे चिंतू, काल किनई आजोबांनी मला एक कोडे सांगितले. मला तर त्याचे उत्तर आले नाही.”


“अरे, असे काय कोडे आहे ते! आम्हाला तरी सांग पाहू.”


चिंटू म्हणाला.
“ते कोडे असे आहे की, सूर्य कोठे जाऊ शकत नाही?” आदित्यने सांगितले.
“साधी गोष्ट आहे. सूर्य कोठेच जाऊ शकत नाही.” मोंटूने सांगितले “कारण तो एकाच जागी स्थिर आहे.”
“ हो ना!” अंतू म्हणाला, “आपली पृथ्वीच तर सूर्याभोवती फिरत असते.”


“मित्रांनो, मीसुद्धा आजोबांना हीच उत्तरे दिली होती.” आदित्य सांगू लागला; परंतु आजोबा मानतच नाहीत. ते म्हणतात, “तुमची उत्तरे विज्ञानानुसार एकदम बरोबर आहेत. पण मला आणखी वेगळे सकारण योग्य उत्तर हवे आहे आणि तेही उचित स्पष्टीकरणासह.”
डबे खाता खाता सगळे मित्र आपापले डोके खाजवायला लागलेत व शेवटी “नाही येत गड्या आपल्याही लक्षात, असे काही वेगळे उत्तर.” असे म्हणून आपापले डबा खात राहिले.
“मी सांगू का?” त्या लाडू-लाह्या विकणा­ऱ्या मुलाने आपली भाकरी खाता खाता विचारले आणि सगळ्यांनी एकदम चमकून त्याच्याकडे पाहिले. आता हा कोणते दिव्य उत्तर सांगणार असे त्यांना वाटले. आधी सर्वांनी त्याची हेटाळणी केली, त्याला फेटाळून लावले; परंतु आदित्य म्हणाला, “तुला येते या कोड्याचे उत्तर?”
“हो. मला माहीत आहे.” तो मुलगा म्हणाला.


“मग सांग पाहू.” आदित्य त्याला म्हणाला तसे सारे कान टवकारून ऐकू लागले.
“अंधार.” तो मुलगा म्हणाला.
“सूर्य अंधारात मुळीच जाऊ शकत नाही.” तो सांगू लागला, “ कारण सूर्य कोठेही जायच्या अगोदरच सूर्याचे प्रकाशकिरणच तेथे पोहोचतात. म्हणून सूर्य अंधाराकडे जायला लागला तर त्याचे अगोदर सूर्यकिरणच तेथे पोहोचतील व त्या किरणांनीच सारा अंधार दूर पळेल व सगळीकडे प्रकाश पसरून उजेड पडेल. अंधारच राहणार नाही म्हणजे सूर्य अंधारात जावूच शकत नाही.” सगळ्यांना त्या मुलाचे म्हणणे पटले. त्याच्या हुशारीचे सा­ऱ्यांनी कौतुक केले. शाळेची मधली सुट्टी संपल्यानंतर सारे आपल्या वर्गात गेले. तो मुलगाही शाळेतच पण दुस­ऱ्या एका वर्गाकडे निघून गेला.

Comments
Add Comment