
नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
आधुनिक चित्रकलेच्या इतिहासात पाब्लो पिकासो हे एक अतिशय महत्त्वाचे नाव मानले जाते. पिकासो यांची अनेक विधाने प्रसिद्ध आहेत. कलाविश्वात त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकदा ते म्हणाले होते, “काही चित्रकार सूर्याचे रूपांतर एका पिवळ्या गोळ्यात करतात तर काही जण पिवळ्या गोळ्याचे रूपांतर सूर्यात करून दाखवतात.”
कविवर्य भा. रा. तांबे हे जरी कवी असले तरी त्यांनीसुद्धा काही अजरामर चित्रे काढली आहेत. फक्त ती रंग, कुंचला, पेन्सिल, कॅनव्हास असे पारंपरिक साहित्य न वापरता केवळ शब्दांनी चितारलीत इतकेच!
अगदी पूर्वी, जेव्हा शालेय पाठ्यपुस्तकात अभिजात साहित्यही समाविष्ट केले जायचे तेव्हा त्यांची एक कविता अनेक पिढ्यांनी वाचली होती. अनेकांना तर ती आजही पाठ असेल. ‘सायंकाळची शोभा’ अशा अगदी बाळबोध नावाखाली छापलेली ती छोटीशी कविता शाळेत शिकल्याचे आठवते.
सायंकाळची वेळ आहे आणि कविवर्य गावाबाहेर फिरायला आले आहेत अशी कल्पना करून राजकवींनी केवळ ८३ शब्दांच्या सहाय्याने ते सुंदर चित्र रेखाटले होते. सायंकाळचे ऊन वेगळेच असते. सकाळसारखे तेही सोनेरी असले तरी त्यात नकळत एक उदासीची अस्पष्ट छटा मिसळलेली असते. गावाकडच्या त्या मावळणाऱ्या सूर्याचे प्रतिबिंब तळ्यात, नदीत किंवा ओढ्यात पडले तर त्याच्या तांबूस-सोनेरी रंगाच्या प्रतीबिंबाचे रूपातंर जणू सतत हलत राहणाऱ्या द्रवरूप सोन्यात झालेले भासते. म्हणून कवी म्हणतो आपल्या गावच्या ओढ्यातून हे सोन्याचे पाणी वाहून चालले आहे.
गावाकडचा सूर्यास्त आणि शहरातला सूर्यास्त यातही खूप फरक असतो. गावाकडचा अगदी ओळखीचा, आयाबायांच्या पहाटेच्या ओव्यात सूर्य नारायण म्हणून वावरणारा सात्त्विक सूर्य तिन्हीसांजेला नदीकाठी असलेल्या एखाद्या जुन्या राउळामागे आश्रय घेत गुडूप होत असतो. शहरातला परका, उपरा सूर्य दुपारी उशिरानंतरच शेजारच्या उंचच उंच इमारतीमागे गायब होऊन जातो. शिवाय त्याच्या येण्याची, असण्याची किंवा जाण्याची कुणालाच फारशी खंतही नसते. गावाकडचा सूर्य मावळताना मात्र आयुष्यातला अजून एक दिवस संपल्याची, काहीतरी हरवल्याची, हुरहूर सगळ्या आसमंतात पसरत जात असते.
“पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर.”
गावाबाहेर कितीतरी उंचच उंच झाडे आपल्या पानांचे इवलेइवले हात हलवून सूर्याला निरोप देत उदास उभी असतात. सूर्य मावळताना त्यांच्या शेंड्यावर त्याची सोनेरी किरणे पडल्याने त्यांनी जणू सोन्याचे मुकुट घातले आहेत असे वाटते आणि जेव्हा कवीची नजर झाडांच्या शेंड्यावरून खाली उतरते तेव्हा त्याला आजूबाजूच्या विस्तीर्ण प्रदेशावर पसरलेली एक गोड गुलाबी छटा दिसते. भाविक मनाच्या कवीला वाटते कुणीतरी इथून नुकतेच गुलाल उधळून गेले आहे!
‘झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी
कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी.’
कविवर्य तांब्यांचे गाव कोकणातील असावे. कारण तिथल्या शेतात भाताची रोपे वाऱ्यावर डोलत उभी आहेत. हिरवेगार, अगदी भरात आलेले शेत म्हणजे जणू कुणीतरी एक गडद हिरवा गालिचाच जमिनीवर अंथरला आहे असे त्यांना वाटते.
‘हिरवेहिरवे गार शेत हे सुंदर साळीचे
झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालिचे.’
कविवर्यांच्या गावात हिरवागार, रसरसता निसर्ग इतका शाबूत आहे की वेगवेगळ्या रंगाची फुलपाखरे दिवसभर फिरून आता शेतातील पानांवर शांतपणे विसावली आहेत. त्यांचे इंद्रधनुष्याच्या रंगाचे मखमली पंख त्यांनी मिटले आहेत. देवधर्म मानणाऱ्या या साध्याभोळ्या मनुष्यवस्तीत त्यांना कसलेही भय वाटत नाही. ती पानांना अगदी चिकटून निजली आहेत. ही रंगीबेरंगी फुलपाखरे भातरोपांवर झोपली आहेत की, त्या पानांच्या पाळण्यात बसून झोके घेत आहेत ते कळत नाही असे कवी म्हणतो.
सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे
रंग किती वर तऱ्हेतऱ्हेचे इंद्रधनुष्याचे
अशी अचल फुलपाखरे,
फुले साळिस जणू झुलती
साळीवर झोपली जणू का
पाळण्यांत झुलती.
पण काही पाखरे अजूनही इकडे तिकडे उडत आपल्याला रात्रीच्या विश्रांतीसाठी चांगली जागा शोधताहेत हे कवी पाहतो. त्याला वाटते त्यांच्या पंखावर तर जसे काही हिरे माणके पाचूच लगडले आहेत.
झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती!
हिरे माणकें पांचू फुटुनी पंखचि गरगरती!
वर आकाशाकडे पाहावे तर पक्ष्यांचे थवेच्या थवे उंच झाडांच्या फांद्यावर गोळा होत आहेत. सगळ्यांची रात्रीच्या विश्रांतीची तयारी सुरू आहे आणि कवी हे सगळे शांतपणे न्याहाळत त्याचा आनंद घेत उभा आहे. पण दरम्यान इतके सगळे होत असताना ज्याच्यामुळे हा दिवस आला आणि संपला तो कर्ताकरविता सूर्य हळूच गायब झाला आहे. मग कवी विचारतो, “ज्याच्यामुळे अवघे विश्व झळाळून उठले होते तो सोन्याचा गोळा कुठे गेला बरे? अरे! आता माझ्यासमोरच तर होता!”
पाब्लो पिकासोच्या दृष्टीने पाहिले तर राजकवींनी लिहिलेली ही कविता, ही कविता नाहीच हे तर एक सुंदर नयनरम्य निसर्ग चित्रच आहे. तांबे नावाच्या सोन्याच्या मुशीतून तयार झालेले मुग्ध, शांतसुंदर असे निसर्गचित्र.
पहा पांखरे चरोनि होती झाडावर गोळा.
कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा?
राजकवींनी वाचकांच्या मनाच्या अदृश्य पडद्यावर उभे केलेले हे एक साधेसरळ शब्दचित्र! ते पाहिले की, मायमराठीच्या साध्या सरळ सौंदर्याची, संवादशीलतेची कल्पना येते. पण त्याचवेळी अलीकडे भाषेकडे किती दुर्लक्ष होते आहे ते पाहिले की वाईटही वाटते. आज साहित्य प्रामुख्याने ज्या माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचते ती मनोरंजनाची क्षेत्रेसुद्धा भाषेच्या संवर्धनाबाबत किती उदासीन आहेत! त्यात सिनेमा, नाटके, कथा-कादंबऱ्या, नितांत सुमार दर्जाच्या पण मोठ्या समुदायावर प्रभाव टाकणाऱ्या टीव्ही मालिका आहेत! परंतु दुर्दैवाने सगळीकडचे चित्र चिंताजनकच आहे. या सर्वांनी कोणतीच भाषा शुद्ध ठेवली नाही. मानवी मनोव्यापाराच्या नेटक्या अभिव्यक्तीचे हे महत्त्वाचे साधन किती निष्प्रभ करून ठेवले आहे ते पाहिले की काळजी वाटते.
खरेच अभिजात मराठीचा तो ‘सोन्याचा गोळा’ कायमचा बुडालाच आहे का?