
पूजा काळे
दिवसा कडकडीत ऊन, रात्री गारवा आणि मधल्या वेळेत पाऊस. ऐन वैशाखात अनुभवाला येणारं हे चित्र म्हटलं तर भयावह. एका ऋतुतून दुसऱ्या ऋतूत होणारे स्थित्यंतर आता घडताना दिसत नाही. अचानक आलेल्या तीव्र बदलाला शरीर आणि निसर्ग जुळवून घेत नाही. परिणामी मागे लागतो आरोग्य तक्रारींचा सिलसिला. दुसरीकडे जानेवारीपासूनच जंगलपट्ट्यात पळस फुलणं म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने धोक्याची सूचना, जी निसर्गाचा समतोल ढासळल्याचं दर्शवते. काल- परवापर्यंत उकाड्याने शरीराची काहिली होत असताना, काळजीचा भाग म्हणून लोकांनी पथ्यपाणी पाळा म्हणेपर्यंत, कुठलीही आगाऊ सूचना न देता पाऊस पडला. कमी दाबाचे पट्टे निर्माण करत दाणादाण उडवत, त्याने आपलं अक्राळविक्राळ रूप दाखवायला सुरुवात केली. मे महिन्याच्या पूर्वार्धात पावसाने लावलेल्या हजेरीला या काळातील सर्वाधिक त्रस्त करणारी घटना म्हणता येईल.
सृजनतेचं प्रतीक असलेला पाऊस हा आपला खरा मित्र. त्याने बरसावं, नवचेतना जागवाव्या, आनंद द्यावा घ्यावा. एवढं सोप्प असताना व्याप वाढवत येणाऱ्या पावसाचं मोकळेपणाने स्वागत तरी कसं करावं? त्याचं कोलमडलेलं वेळापत्रक किती वाईट परिस्थिती बघायला लावणारं आहे कुणास ठाऊक...! ‘झळा या लागल्या जीवा’ म्हणत वेगवेगळ्या ठिकाणी असणारं पाण्याचं दुर्भिक्ष्य, कोरड्या विहिरी, पाणवठे यांची मोजदाद झाली नसताना, वादळासह उच्छाद मांडणारा पाऊस शेतकऱ्यांबरोबर सामान्यांचे तीन तेरा वाजवतोय. जोवर निसर्गाची हाक आपण ऐकत नाही तोवर एक दिवस खरोखर हा निसर्ग आपल्या डोक्यावरील हात काढून टाकेल याची खात्री पटत चाललीयं. बेभरवशाच्या पावसाचा सार्वत्रिक परिणाम अर्थकारणावर होईलचं शिवाय महागाई वाढेल. आज महाराष्ट्रातील अवस्था वाईट आहे. पावसामुळे पीक पाण्याखाली गेल्याने शेतीचं नुकसान झालंय. फळबागा नष्ट झाल्या आहेत. आभाळ फाटल्याचा परिणाम चहूकडे पाण्याचंं राज्य घेऊन आलाय.
याची कारणं शोधताना खूप मागे जावं लागेल. महत्त्वाकांक्षेतून क्रांती घडली आणि मर्यादित पातळी ओलांडली गेली. वैश्विक पातळीवर बदलण्याची आस आणि नावीन्याचा ध्यास हा सृष्टीचा स्थायिभाव होता. वैज्ञानिक दृष्टिकोन जपणे हा जग आणि देश प्रगतीपर विचारातील महत्त्वाचा टप्पा होता. विज्ञान विचार यात्रेची चळवळ २१ व्या शतकात झपाट्याने फोफावली आणि मानवी उद्धाराची सर्वोत्तम महत्त्वाकांक्षा राक्षसीवृत्ती दाखवून गेली. मानवाचं निसर्गाशी असलेलं मैत्रीपूर्ण नातं संपुष्टात येताना काही ठळक गोष्टी पुढे आल्या. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी औद्योगिक क्रांतीचा विकास झाला. जुनं ते हवं आणि नवं तेही हवं म्हणत, विकासाचे मार्ग खुले झाले. उत्पादन कार्य क्षमतेबरोबर, दळणवळणाच्या सोयी वाढल्या. कृषी क्षेत्रात नवीन शोध लागले. शहरीकरणासाठी जंगल कापून टाकण्यात आली. यामुळे तापमानातली वाढ, तर दुसरीकडे ग्लोबल वॉर्मिंगची भीती बळावू लागली. भूकंप, महापूर, वणवा, नदीचा प्रवाह बदलणे, गारा पडणे, अतिवृष्टी, दुष्काळ याचे परिणाम जाणवू लागले. पृथ्वी आणि हवेच्या तापमान प्रणालीत अपेक्षेपेक्षा जास्त चढ-उतार झाल्याने हवामान बदलाचे परिणाम दिसून आले, ज्यामध्ये वनस्पती, शेती, मानव, पाणथळी आणि इतर प्रणाली समूळ नष्ट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली. येणारा धोका प्रत्येकी वेगळा असू शकतो हे जाणून वेळस्थानानुसार हवामान बदलाच्या संभाव्य धोक्यांवर लक्ष ठेवून कार्यप्रणाली आखायला हवी. मानवप्राणी वन्यजीव, निसर्ग यांना नवनवीन आव्हानांना सामोरे जावं लागतयं.
वादळवारा, उष्णतेच्या लाटा, पाऊस हे प्राणीमात्रांसह, मनुष्य जीवनाचा अंत ठरू पाहत आहेत. वातावरणात वाढलेली कार्बन, मिथेनची वायूपातळी हवामान बदलाचा स्त्रोत आहे. अन्नप्रणाली, पाण्याचं दुर्भिक्ष्य, वाढणारे मृत्यूदर, हृदयविकार, दम्यासारखे आजार, खाण्याच्या सवयी, उत्पादन साखळी यावर अधिक परिणाम होतोय. वाढलेल्या उष्णतेमुळे हवेत कोरडेपणा येऊन वणवा पेटण्याचे प्रसंग ओढवत आहेत. सागरी वाऱ्याच्या दिशा निश्चित असल्या, तरी उष्णता शोषणारे महासागर वातावरणात सरासरीपेक्षा लक्षणीय बदल घडवतात, ज्यामुळे महासागरातलं आम्लीकरण झपाट्याने वाढतयं. कोरल संपुष्टात येताना जमीन नापीक होण्याचे प्रमाण वाढतयं. हवामान बदलावर उपाय म्हणून, झाडांचं जतन-संवर्धन करणं, कृषी उत्पादकता वाढवणं, स्मार्टशेतीचा पर्याय निवडणं, कचऱ्याचा पुनर्वापर, अक्षय ऊर्जा संसाधनांचा वापर, सार्वजनिक वाहतूक करणं, पाण्याचा अपव्यय टाळणं, विजेची बचत करणं या प्रकारे नियोजन केलं तरंच आपण मोकळा श्वास घेऊ, जेणेकरून पुढच्या पिढीला मदत होईल. निसर्गाचा समतोल सावरण्यास प्रत्येकाने हातभार लावला तर जीवन सुखकारक होईल, जो जगण्याचा तारकमंत्र ठरेल. अन्यथा पाणी पिण्यापुरता उपलब्ध न होता पावसाच्या रूपाने हाहाकार माजवेल आणि चहुकडे पाणीचं पाणी भरेल.